युद्धाचे चटके! महागाईचा भडका!! तेलाच्या किमतींचा उच्चांक, शेअर बाजार गडगडला!

इराण-इस्रायल युद्धामुळे भडकलेल्या आगीत अमेरिकेने तेल ओतल्याचे चटके आता जगाला बसू लागले आहेत. सर्वाधिक परिणाम तेलाच्या महागाईवर झाला आहे. भारतीय शेअर बाजारालाही या घडामोडींची झळ बसली असून सेन्सेक्स 500 तर निफ्टी जवळपास 150 अंकांनी गडगडला आहे.

इराण-इस्रायल युद्धात दहाव्या दिवशी अमेरिकने उडी घेतली आणि इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हुकमी अस्त्र बाहेर काढले. जगाला तेलपुरवठा करणारा (होर्मुझ सामुद्रधुनी) प्रमुख जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली. त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. सोमवारी क्रूड ऑईलच्या किमती मागील पाच महिन्यांतील उच्चांकावर पोहोचल्या. इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून मागच्या दहा दिवसांत कच्च्या तेलाचे भाव 13 टक्क्यांनी वाढले आहेत.

इराणच्या निर्णयावर सर्व अवलंबून

इराण हा पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेतील (ओपेक) तिसरा सर्वात मोठा सदस्य आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास तेलाच्या पुरवठय़ावर परिणाम होऊन किमती आणखी भडकू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गे जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होतो. त्यामुळे इराण काय करणार यावर बरेच काही अवलंबून असेल.

सेन्सेक्स, निफ्टीच्या गटांगळ्या

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम शेअर बाजारांवरही दिसू लागला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) आज 500हून अधिक अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 140 अंकांनी गडगडला. इन्पह्सीस, एचसीएल टेकसह आयटी पंपन्यांना जागतिक अशांततेचा मोठा फटका बसला.