इराणचा कुवेत, दुबई आणि इस्रायलवर मोठा हल्ला; कुवेत विमानतळाची रडार यंत्रणा उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशनमधील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. शनिवारी इराणने कुवेत, दुबई आणि इस्रायलवर एकाच वेळी मोठे ड्रोन हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यात कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रडार यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून, हवाई वाहतुकीवर याचे गंभीर परिणाम झाले आहेत.

कुवेतच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, अनेक आत्मघाती ड्रोन्सनी कुवेत विमानतळाला लक्ष्य केले. यामध्ये विमानतळाची मुख्य रडार यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी (ATC) ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते, तीच आता उद्ध्वस्त झाल्यामुळे विमानतळावरील कामकाज विस्कळीत झाले आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकृत प्रवक्ते अब्दुल्ला अल-राजही यांनी सांगितले.

कुवेतसोबतच संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई शहरालाही इराणने लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. इराणने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स रोखण्यासाठी युएईच्या हवाई संरक्षण यंत्रणेने तत्काळ प्रत्युत्तर दिले. दुबई आणि अबु धाबीमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले.

याशिवाय इराण समर्थित हौथी बंडखोरांनी शनिवारी पहाटे इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. मध्यपूर्वेतील युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा त्यांचा पहिलाच हल्ला आहे. यातच इस्रायली लष्कराने हे क्षेपणास्त्र रोखल्याचे सांगितले आहे.