इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. रायसी यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दोल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर आणि इतर अधिकारी आणि अंगरक्षक होते. या दुर्घटनेमध्ये रायसी यांच्यासह सर्वांचाच मृत्यू झाल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
इब्राहिम रायसी यांना एका धरणाच्या उद्घाटनासाठी पूर्व अझरबैजान प्रांताकडे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी खराब हवामानामुळे दुर्गम जंगल भागात कोसळले होते. अपघाताला 17 तास उलटून गेल्यानंतर बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लागला आहे. भीषण दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टर जळून खाक झाले असून याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या अपघातामध्ये इब्राहिम रायसी यांच्यासह सर्वांचाच मृत्यू झाला. यामुळे इराणवर शोककळा पसरली आहे.
Iran’s President Ebrahim Raisi, foreign minister and others found dead at helicopter crash site, reports AP, citing state media
— Press Trust of India (@PTI_News) May 20, 2024
नक्की काय घडलं?
63 वर्षांचे कट्टरपंथीय रायसी हे इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांचे उत्तराधिकारी मानले जातात. 2021 मध्ये ते निवडून आले आहेत. अझरबैजानच्या सीमेवर आरास नदीवर बांधलेल्या धरणाचे उद्घाटन करून रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदोल्लाहियान परतत असताना पाऊसवाऱ्यामुळे धुक्यात दडलेला डोंगराळ भाग ओलांडत असताना हा अपघात झाल्याचे इराणच्या अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.