महिन्याला आता एकच सिलिंडर! सीएनजीचीही टंचाई, पंपांवर वाहनांच्या रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धामुळे हिंदुस्थानात गॅस संकट उभे ठाकले आहे. युद्धामुळे नैसर्गिक वायू पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यासोबतच आता सिलिंडर नोंदणीचा कालावधी वाढवला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता एक सिलिंडर प्राप्त झाल्यानंतर दुसरा सिलिंडर 25 दिवसांनीच नोंदवता येणार आहे.

इराणने कतारमध्ये हल्ले केल्यामुळे सुमारे 30 टक्के वायू पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस वितरक पंपन्यांना घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयांनी नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक घरांमध्ये दोन गॅस सिलिंडर असतात. गॅस नोंदणी केल्यानंतर साधारणतः दोन ते चार दिवसांनी सिलिंडर घरपोच मिळायचा. त्यानंतर दुसऱ्या सिलिंडरची नोंदणी 15 दिवसांनी करता येत होती. आता हा कालावधी 25 दिवसांचा करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महिन्यातून एकदाच गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. तसे बदल अॅप तसेच इतर ऑनलाईन नोंदणीसाठी करण्यात आले आहेत.

व्यावसायिक सिलिंडरदेखील महिन्यातून एकच

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरची विक्री थांबवण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. तेल पंपन्यांकडून वितरकांकडे होणारा पुरवठाच थांबवण्यात आला होता. मात्र आता नवे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महिन्यातून एकच व्यावसायिक सिलिंडर मिळणार आहे.

‘त्या’ आदेशाबाबत केंद्राचा खुलासा

व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा रोखून केवळ घरगुती ग्राहकांनाच गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याचे आदेश पेट्रोलियम मंत्रालयाने दिले होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटसह व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले होते, मात्र गोंधळ उडाल्यानंतर मंत्रालयाने याबाबत खुलासा केला. व्यावसायिक सिलिंडर विक्रीवर बंदी नसून दुसऱया सिलिंडरच्या नोंदणीबाबत निर्बंध घातले आहेत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

राज्यात इंधन टंचाई नाही – मुख्यमंत्री

राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या माध्यमांवर आल्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण रांगा लागल्या आहेत. मात्र कुठेही इंधन टंचाई नाही आणि त्याबाबत केंद्र सरकारनेही भूमिका स्पष्ट केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

  • युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. रत्नागिरी जिह्यातील चिपळूणमध्ये सीएनजीच्या टंचाईमुळे पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनचालकांची गैरसोय झाली. मुंबई महानगरातही पुढील काही दिवसांतच सीएनजी टंचाईचे संकट ओढवण्याची भीती आहे. त्याच भीतीपोटी रविवारी अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांनी सीएनजी पंपांकडे मोर्चा वळवला. त्यामुळे काही पंपांवर रांगा लागल्याचे चित्र होते.

ओटीपीशिवाय सिलिंडर नाही

गॅस सिलिंडर नोंदवल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी दिला जातो. आता घरपोच गॅस सिलिंडर आल्यानंतर ओटीपी सांगितल्याशिवाय तुम्हाला सिलिंडर मिळणार नाही. सध्याच्या परिस्थितीत ओटीपी पडताळणी सक्तीची करण्यात आली आहे.