आखाती देशांवर इराणचे ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ले, बहरीनच्या तेल रिफायनरीला केले लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारीही इराणकडून आखाती देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच राहिले. या हल्ल्यांमध्ये ऊर्जा क्षेत्रालाही लक्ष्य करण्यात आले. बहरीनमधील सरकारी तेल रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यानंतर कंपनीला ‘फोर्स मॅजेअर’ जाहीर करावी लागली. Bapco Energies ने दिलेल्या निवेदनानुसार, मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या प्रादेशिक संघर्षामुळे आणि रिफायनरी कॉम्प्लेक्सवरील अलीकडील हल्ल्यांमुळे कंपनीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.

कंपनीच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थिती निर्माण झाल्याने उत्पादन आणि निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कंपनीला करारातील काही जबाबदाऱ्या तात्पुरत्या स्थगित करण्यासाठी “फोर्स मॅजेअर” लागू करावे लागले. फोर्स मॅजेअर हा एक कायदेशीर कलम आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, हल्ले किंवा इतर अनपेक्षित घटनांमुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाल्यास हे कलम लागू केले जाते. यामुळे कंपन्यांना तेल किंवा वायू पुरवठ्यासारख्या करारातील जबाबदाऱ्या तात्पुरत्या थांबवण्याची मुभा मिळते. बहरीनच्या रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यांनंतर Bapco Energies ने हे कलम लागू केले असून, त्यामुळे ऊर्जा निर्यात आणि शिपमेंटमध्ये विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान सौदी अरेबियाने इराणच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. सौदी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आखाती देशांवर सुरू असलेली इराणची आक्रमक कारवाई चिंताजनक आहे. हे हल्ले सुरूच राहिले, तर इराणला मोठे राजनैतिक, आर्थिक आणि धोरणात्मक परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही सौदी अरेबियाने दिला आहे.

२८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणमधील लक्ष्यांवर केलेल्या हल्ल्यांनंतर तणाव आणखी वाढला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकन लष्करी तळांना आश्रय देणाऱ्या आखाती देशांना लक्ष्य करण्याची कारवाई तीव्र केली आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरही होणार आहे.