
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलीवूड अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. आठ महिने लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर इरफान मुंबईत परतला आहे. लवकरच तो हिंदी मीडियम या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावर इरफान दिसला होता.

तो मुंबईबाहेर जाताना चाहत्यांची त्याच्यावर नजर पडली. हलक्या गुलाबी रंगाचे जॅकेट घातलेल्या इरफानने चेहरा मात्र रुमालाने झाकला होता. विमानतळावर तो घाईत आला आणि तेवढ्याच घाईत तो गेलाही. इरफानला न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर नावाचा दुर्मिळ आजार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इरफान केव्हा परततो असे त्याच्या चाहत्यांना झाले होते. दरम्यान, इरफानही सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना द्यायचा. पण नंतर तो अचानक गायब झाला. यामुळे त्याचे चाहतेही बैचेन झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच तो मुंबईत परतला असून थोडा आराम केल्यानंतर तो कामास सुरुवात करणार आहे. 2017 साली इरफानच्या हिंदी मीडियम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला होता. त्याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं शूटींग आता सुरू होणार आहे.



























































