जलसंपदा विभागाच्या कळवण कार्यालयाला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कळवण

चार वर्षांपूर्वी मंत्रालयातील जलसंपदा विभागाला लागलेल्या आगीची पुनरावृत्ती आज पहाटे कळवण येथे झाली. जलसंपदा विभागाच्या पुनंद उजवा व डावा कालवाच्या कळवण तालुक्यातील मानूर येथील कार्यालयाला आग लागली. प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे दिसून येत असले तरीही महत्त्वाची कागदपत्रे असलेल्याच केबीन कशा काय जळाल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आज पहाटे पुनंद उजव्या व डाव्या कालव्याच्या दोन वेगवेगळ्या कार्यालयांतील महत्त्वाचे दस्तऐवज दप्तर असलेल्या दोन खोल्यांना आग लागून संपूर्ण दप्तर लाकडी रॅक, संगणक, प्रिंटर, टेबल, खुर्च्या व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. याबाबत पुनंद उजवा कालवा कार्यालयातील शाखा अभियंता दिलीप बच्छाव यांनी कळवण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी जगताप नामक जलसंपदा विभागाचे चालक यांनी त्यांना कार्यालयाला आग लागल्याची माहिती दिली. ही आग पहाटे पाच वाजेपूर्वी शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

-कामाची चौकशी

कळवण तालुक्यात पुनंद धरण काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून या धरणांतर्गत सन 2005 ते 2006 दरम्यान सुळे उजवा व सुळे डावा कालव्याचे काम करण्यात आले आहे. कालवा तयार होऊन 9 ते 10 वर्षे झाले आहेत अद्यापर्यंत पाटविहीरपर्यंत कालव्याला पाणी आलेले नाही येथील शेतकरी गेल्या दशकभरापासून धरणातील पाण्यापासून वंचित राहिला आहे. या वंचित शेतकऱयांनी 15मे रोजी आमदार जे.पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री गिरीश महाजन यांना कालव्याच्या चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. त्याचवेळी महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार काही दिवसांपासून या कालव्याच्या निकृष्ट कामाची चौकशी सुरू आहे.

-संशयाचा धूर

पुनंद कालव्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्यामुळे या कार्यालयात माहितीच्या अधिकारात अनेक अर्ज आले आहेत. तसेच कडवा प्रकल्पाचेही कागदपत्र ठेवण्यात आली होती. माहिती वेळेत न दिल्याने आपल्या अधिकारी, विभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणी चालू असल्याने खरी माहिती लपविण्यासाठी आग लावण्यात आली का अशी चर्चा जोरात आहे.

आज कार्यालयाला लागलेल्या आगीचे स्वरूप पाहता 40 ते 50 फूट अंतर असलेल्या दोन वेगवेगळ्या इमारतींतील फक्त कागदपत्रे असलेल्या खोल्यांनाच आग लागल्याने ही आग प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत आहे. या विभागाची चौकशी सुरू असल्याने आग लागली की लावली याची चौकशी झाली पाहिजे.

– प्रदीप पगार – अध्यक्ष, क्रांतिवीर छावा संघटना.

जलसंपदा विभागाच्या कार्यालयास आग लागून दप्तर जळून खाक झाले असले तरीपण कालव्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार सर्वज्ञात आहे. पुनंद धरणातून कालव्याला आजही पाणी सोडले तरी पाटविहिरीपर्यंत पाणी येणार नाही हे सत्य नाकारता येणार नाही. याची चौकशी झाली पाहिजे.

– अंबादास जाधव – शिवसेना तालुकाप्रमुख.