इर्शाळवाडीच्या बचावकार्यात धुवांधार पावसाचा अडथळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीखाली दबलेल्यांना बाहेर काढणाऱया एनडीआरएफच्या जवानांसमोर निसर्गाच्या रौद्ररूपाचे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणारा धुवांधार पाऊस, दाट धुके, पाण्याचे प्रचंड लोट आणि वेगाने वाहून येणारा चिखल, मातीचा राडारोडा यांच्याशी सामना करत एनडीआरएफचे बचावकार्य आज दुसऱया दिवशीही सुरू आहे. चिखल, मातीचा ढिगारा उपसल्यानंतर त्यात वरून वेगाने येणारे पावसाचे पाणी साचत असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे निर्माण झाले असून आता परिसरात दबलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे. आज आणखी सहा मृतदेह सापडल्याने बळींचा आकडा 22वर पोहोचला असून अजूनही अनेकजण ढिगाऱयाखाली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

इर्शाळगडाच्या कुशीत असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत 25 घरे व 120 गावकरी त्याखाली गाडले गेले. एनडीआरएफ, टीडीआरएफ व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी बचावकार्य सुरू केले. इर्शाळवाडी अत्यंत दुर्गम डोंगरात असल्याने पहिल्या दिवशी तेथे कोणतीही यंत्रे पोहोचू शकली नाहीत. सायंकाळी उशिरापर्यंत एनडीआरएफच्या जवानांनी 16 मृतदेह ढिगाऱयाखालून बाहेर काढले. सततचा पाऊस आणि काळोख यामुळे गुरुवारी बचावकार्य थांबवण्यात आले.

प्रांताधिकारी अजित नैराळे, खालापूरचे तहसीलदार अयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूरचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य पथकाची टीम नियोजन आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहे.

दुसऱया दिवशीही हेलिकॉप्टर पोहोचू शकले नाही
आज पहाटे सहा वाजताच एनडीआरएफ जवानांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पहाटेपासूनच अखंड कोसळणाऱया धो धो पावसात बचावकार्य सुरू झाले. गुरुवारचीच परिस्थिती आजही कायम होती. खराब हवामानामुळे आजही हेलिकॉप्टर इर्शाळवाडीला येण्यासाठी उडू शकले नाही. त्यामुळे केवळ कुदळ, पहार, फावडे आणि घमेले इतक्याच अवजारांवर एनडीआरएफच्या जवानांना बचावकार्य करावे लागले.

दरड, माती दूर केली की त्यात पाण्याचे लोट घुसायचे
धुवांधार पावसाचा मारा, दहा फुटांवरचेही दिसणार नाही इतके दाट धुके, गडावरून धबधब्यासारखे येणारे पाण्याचे लोट आणि त्याबरोबर वाहून येणारा चिखल, मातीचा राडारोडा या अडथळय़ांचा सामना बचाव पथकाला करावा लागत होता. 20 फूट दरडींखाली दबलेल्या घरांमधील गावकऱयांचा शोध घेणे दुरापास्त झाले होते. दरड आणि चिखल, माती फावडय़ाने दूर केली की तिथे होणाऱया खड्डय़ांमध्ये वरून येणारे पाण्याचे लोट साचत होते. ते पाणी काढून पुन्हा खड्डा केला की त्यात पुन्हा पाण्याचे डबके तयार होत असल्याने बचाव पथकाचा कस लागत होता.

मृतदेहांवर वाडीजवळच अंत्यसंस्कार
दरड कोसळल्याच्या घटनेला 48 तास उलटून गेल्याने दरडीखाली दबलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करीत आहेत. गुरुवारी 16 मृतदेह सापडल्यानंतर आज दुसऱया दिवशी तीन महिलांसह सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 22 वर पोहोचली आहे. या मृतदेहांवर वाडीजवळच अंत्यसंस्कार करण्यात आले.