भिवंडीतील बोरिवली गाव ‘इसिस’ने जाहीर केले ‘अल शाम’, तरुणांना दिली जिहादशी एकनिष्ठ राहण्याची शपथ

दहशतवाद्यांचा अड्डा असलेले भिवंडीतील पडघा-बोरिवली गाव ‘इसिस’ने ‘अल शाम’ म्हणून घोषित केले आहे. अल शामचा अर्थ ‘मुक्त क्षेत्र’. इथला रहिवाशी आणि इसिसचा म्होरक्या साकीब नाचन याने तरुणांना ‘इसिस’शी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिल्याची धक्कादायक बाब एनआयएच्या तपासात उघड झाली आहे. नाचन स्वतःला ‘खलिफा’ (अल्लाहचा उत्तराधिकारी) समजत असून त्याने जिहादी युवकांना पडघ्यात आणून दहशतवादाचे खडतर प्रशिक्षण दिल्याचेही समोर आले आहे. पडघा म्हणजे आमच्यासाठी स्वतंत्र क्षेत्र (अल शाम) असल्याचा दावादेखील साकीबने केल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पडघा हे मुख्य शहरापासून काहीसे लांब असल्याने तेथील दहशतवादी कारवायांबाबत सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती होत नाही. मात्र साकीब नाचन याने धर्माचा अभ्यास करण्याच्या नावाखाली पडघ्याला सिरिया बनवण्याची तयारी साथीदारांच्या मदतीने केली होती.

पडघा भागात इसिसमध्ये सामील झालेल्या तरुणांना आणून तेथे शस्त्राचे प्रशिक्षण दिले जायचे. त्यासाठी पडघ्याची निवड करण्यात आली. एवढेच नव्हे तर या गावाचे नामांतर ‘अल शाम’ असेही केले. मात्र एनआयएच्या पथकाने साकीब व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांचा प्लॅन उधळवून लावला आहे.

पडघ्यात इसिसचे जाळे तयार करण्यासाठी साकीब काम करीत होता. त्याने अनेक तरुणांना ‘बायथ’ (शपथ) दिली. एनआयएने केलेल्या धडक कारवाईमुळे पडघा-बोरिवली गाव हादरून गेले आहे.

एनआयएचे पथक वऱहाडी बनून आले अन् गावात घुसले

शनिवारी पडघ्यातील नाचन कुटुंबात लग्न सोहळ्याची धामधूम सुरू होती. बोरिवली गावात हे लग्न होते. तयारी ऐन रंगात आली असतानाच सगळे जण एकत्र आले. एनआयएच्या पथकातील अधिकारीदेखील वऱहाडी बनून गावात घुसले आणि त्यांनी साकीब नाचनला ताब्यात घेतले. एनआयएच्या या कारवाईबद्दल पडघा-बोरिवली गावातील कुणीही बोलायला तयार नाही. सगळे ग्रामस्थ धास्तावले असून पोलीस केव्हाही घुसतील या भीतीने गावकऱयांची झोपच उडाली आहे.

n एनआयएच्या पथकाने शनिवारी इसिसशी कनेक्शन असलेल्या देशभरातील 44 ठिकाणी धाडी टाकून 15 संशयित दहशतवाद्यांना अटक केली. ठाणे, पुण्यासह दिवसभर ही छापेमारी चालली. भिवंडीतील पडघ्याजवळील बोरिवली गावातून मुंबई बॉम्बस्पह्टातील जामिनावर सुटलेला आरोपी साकीब नाचनच्या मुसक्याही एनआयएने आवळल्या.