जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मध्यपूर्वेत घमासान, बगदादवरही तुफान हल्ले; युरोपीय देशांकडून तयारी सुरू

जगातील अनेक भागांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. एकीकडे 30 दिवसांच्या युद्धविरामानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली, तर दुसरीकडे इस्रायल आणि हमासमध्येही घमासान सुरू आहे. मध्यंतरी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्येही युद्धाचा भडका उडाला होता. आता इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले केल्याने आणखी एका नव्या युद्धाची ठिणकी पडली. दोन्ही देश एकमेकांवर भयंकर हवाई हल्ले करत आहेत. त्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंघावताना दिसून येत आहे.

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर 200 लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे 100 हून अधिक नागरीक, लष्करी अधिकारी, अणुशास्त्रज्ञ ठार झाले. इराणने हवाई क्षेत्र बंद करत आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर इराणने ‘ऑपरेशन प्रॉमिस’ अंतर्गत इस्रायलवर पलटवार केला आणि 150 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. यात इस्रायलमधील 70 हून अधिक नागरीक जखमी झाले, तर 1 जण ठार झाला.

Israel-Iran War – इराणकडून आगीत ‘तेल’; युद्धाचा भडका, इस्रायलवर हल्ला करत इमारती लक्ष्य

इस्रायल-इराणमधील तणाव शिगेला पोहोचलेला असताना आता इराकमध्येही हल्ल्यांचे वृत्त आहे. बगदादमध्ये स्फोटांचे मोठे आवाज आले आहे. बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ हल्ला झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे इस्रायल, इराणसह इराकमधील एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय करण्यात आली आहे.

युरोपीय देशांकडून तयारी सुरू

मध्यपूर्वेत इस्रायल-इराणमध्ये घमासान सुरू झाल्याने जगावर महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर युरोपियन राष्ट्रांनीही जोरदार तयारी सुरू आहे. अनेक देशांनी सैनिकांची भरती सुरू केली आहे. काहींनी विशिष्ट इमारती आणि आवश्यक सुविधाही तयार केल्या आहेत. आणीबाणीच्या स्थितीत सुरक्षेसाठी त्यांचा वापर केला जाईल. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंकरही बांधण्यात आलेले आहेत.

डेन्मार्कने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, इस्रायलचा मित्र समजल्या जाणाऱ्या डेन्मार्कने एक मोठा निर्णय घेतला आहे. डेन्मार्कमध्ये 1 जुलै 2025 पासून महिलांना लष्करी प्रशिक्षण, भरतीसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.