
इस्रायल आणि इराणमधील युद्ध आठव्या दिवशीही सुरू आहे. यामुळे जगाची चिंता वाढली असून मध्यपूर्वेकडील आकाशामध्ये महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ करण्यास सांगितले होते. मात्र अमेरिकेच्या या धमकीला इराणने भीक घातली नाही आणि इस्रायलच्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रांचा तुफान मारा केला. यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही अप्रत्यक्षपणे याची कबुली दिली असून या युद्धाची किंमत प्रत्येक जण चुकवत असल्याचे म्हटले. तसेच इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे मुलाचे लग्न दुसऱ्यांदा पुढे ढकलले गेल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून त्यांना इस्रायलच्या नागरिकांनी ट्रोलही केले आहे.
मंगळवारी रात्री इराणने अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी इराणने तेल अवीव, बेअरशेबा, रमत गान आणि होलोन या 4 प्रमुख इस्रायली शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. तेल अवीवमधील इस्रायली स्टॉक एक्स्चेंज इमारत आणि बीअरशेबा येथील सोरोका रुग्णालयाबरोबर विविध ठिकाणी 30 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यात इस्रायलचे 176 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सोरोका रुग्णालयाला भेट दिली.
इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाचे वैयक्तिक परिणाम झाले आहेत. लोक दुखावले गेले असून कुटुंबियांनी आपले प्रियजन गमावले आहेत. आपल्या प्रत्येकावर युद्धाचा वैयक्तिक परिणाम झाला आहे. माझे कुटुंबही यातून सुटलेले नाही. मी देखील याची किंमत चुकवत असून क्षेपणास्त्र हल्ल्यांच्यामुळे माझा मुलगा अनवर याचे लग्न दुसऱ्यांदा पुढे ढकलावे लागत आहे. त्यांच्या प्रियसीही या युद्धाची वैयक्तिक किंमत चुकवत आहे. माझी पत्नीही एक लढवय्या नायिका आहे, ती देखील या युद्धाची वैयक्तिक किंमत चुकवत आहे, असे नेतन्याहू म्हणाले.
दरम्यान, सोरोका रुग्णालयावर इराणने भ्याड हल्ला केल्याचे ते म्हणाले. त्यांनी या हल्ल्याची तुलना दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बस्फोटांशी केली. जर्मनीने ब्रिटनवर साखळी हल्ले चढवले होते आणि शहरे, औद्योगिक केंद्रांचे नुकसान केले होते. याच्याशी तुलना करत नेतन्याहू यांनी आपणही या युद्धात त्याग केल्याचे नमूद केले. अवनरचे लग्न दुसऱ्यांदा पुढे ढकलल्याने त्याची प्रियसी आणि माझी पत्नी सारा हिच्यावरही खोलवर परिणाम झाल्याचे ते म्हणाले.
इराणने इस्रायलचा शेअरबाजार उडवला, रुग्णालयही उडवले; 176 लोक जखमी
अवनेर नेतन्याहू कोण आहे?
पंतप्रधान नेतन्याहू यांना दोन मुलं आहेत. त्यांचा धाकटा मुलगा अवनेर याचे त्याची प्रियसी यार्डेनी याच्याशी सोमवारी लग्न होणार होते. मात्र इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हे लग्न रद्द करावे लागले. अवनेर याचा जन्म 1994 मध्ये झालेला असून इस्रायली सैन्यातही त्याने सेवा केलेली आहे. याआधी 2024 मध्ये त्याच्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला गेला होता.


























































