Chandrayaan 3 latest – वो चांद खिला वो सारे हसे! देशभरात जल्लोष,आसमंत प्रकाशल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रोचे महत्त्वाकांक्षी ‘मिशन चंद्र’, ‘चांद्रयान-3’चे लँडर मॉडय़ूलने बुधवारी सायंकाळी 5 वाजून 44 मिनिटांना लँडिंग प्रक्रिया सुरू केली. यानंतर पुढील 20 मिनिटांत चंद्राच्या अखेरच्या कक्षेने 25 किलोमीटरचे अंतर कापले. सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी ‘चांद्रयान-3’च्या लँडरने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. चांद्रयानाने चंद्राला स्पर्श करीत नवा ‘विक्रम’ प्रस्थापित केला. इस्रोच्या आजच्या कामगिरीकडे हिंदुस्थानातील 140 कोटी जनतेसह अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. अनेकांची धाकधूक वाढली होती. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून सगळेच टीव्हीसमोर बसून होते. लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानमधून एलएमने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करताच संपूर्ण हिंदुस्थानात एकच जल्लोष झाला.

3 लाख 84 हजार किमी प्रवास

‘चांद्रयान-3’ला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी लाँच केले गेले होते. चंद्रावर लँडिंग करण्यास 41 दिवस लागले. पृथ्वी ते चंद्र हे अंतर 3 लाख 84 हजार कि.मी. आहे.

केल्याने चंद्राटन…

6 जुलैः इस्रोने चांद्रयान-3 मिशन लाँच करणार असल्याची माहिती दिली. 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान अंतराळात पाठवले जाईल असे जाहीर केले.

7 जुलैः लाँच पॅडचं निरीक्षण.

14 जुलैः चांद्रयान-3 मोहिमेचे श्रीहरिकोटा येथून दुपारी 2.35 वाजता जीएसएलव्ही मार्क 3 (एलव्हीएम 3) हेवी-लिफ्ट लाँच व्हीकलद्वारे यशस्वी प्रक्षेपण.

1 ऑगस्टः चांद्रयान चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचलं. या दिवसापासून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून लँडिंगच्या तयारीला सुरुवात.

5 ऑगस्टः चांद्रयान 3 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश.

6 ऑगस्ट ते 16 ऑगस्टः चांद्रयानाने चंद्राची प्रदक्षिणा सुरू केली. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास सुरू केला.

17 ऑगस्टः चांद्रयान मिशनमध्ये महत्त्वाचा असलेला लँडर प्रोपल्शन मॉडय़ूलपासून यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. यानंतर चंद्राच्या दिशेने लँडरचा प्रवास सुरू झाला.

20 ऑगस्टः लँडिंगच्या प्रक्रियेला सुरुवात.

23 ऑगस्टः चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर उतरलं.

पुढे काय…

धूल सेटल झाल्यानंतर विक्रम लँडर सुरू होईल आणि संवाद करेल. 

पुन्हा रँप उघडेल. प्रज्ञान रोवर रँपहून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. 

चंद्राच्या मातीत अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडेल.

विक्रम लँडर प्रज्ञानचा फोटो आणि प्रज्ञान विक्रम विक्रम लँडरचा फोटो काढेल. हे फोटो पृथ्वीवर पाठवले जातील.

अभूतपूर्व

चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरले. भारतासाठी हा अभूतपूर्व क्षण आहे. भारताचं विज्ञान आणि खगोल क्षेत्रातलं स्थान सिद्ध करणारी ही कामगिरी आहे. इस्रो, भारतीय वैज्ञानिक आणि सर्व भारतीयांचे खूप खूप अभिनंदन, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यांद्रयान मोहिमेचे कौतुक केले.

आता आदित्य

चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रो आता लवकरच मिशन आदित्य एल-1 ही मोहीम हाती घेणार आहे. 

अपयशातून धडा

14 जुलै 2023 रोजी ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-3’ला लाँच केले होते. याआधी हिंदुस्थानने चार वर्षांपूर्वी सप्टेंबर 2019मध्ये ‘चांद्रयान-2’चे लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात अपयश आले होते. या वेळी शास्त्रज्ञांनी ‘चांद्रयान-3’मध्ये अनेक बदल केले होते. यामुळे यशाचा ठाम विश्वास होता.

हिंदुस्थान ठरला चौथा देश

चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा हिंदुस्थान चौथा देश ठरला आहे. याआधी अशी कामगिरी अमेरिका, चीन आणि सोव्हियत युनियनने केली आहे.

कुंचलाही बोलला, ‘वेल डन’

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आलोक यांनी चंद्र मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर आपल्या पुंचल्यातून दोन अफलातून व्यंगचित्रे रेखाटली. पहिल्या व्यंगचित्रात पृथ्वी आणि चंद्र रक्षाबंधन सण साजरा करताना दाखवले असून त्याला ‘प्री रक्षाबंधन’ असे नाव दिले. तर दुसऱया व्यंगचित्रात प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे छायाचित्र रेखाटून ‘वेल डन’ अशा शब्दांत ’इस्रो’च्या टीमचे कौतुक केले आहे.