
सामना प्रतिनिधी । नागपूर
आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व विरोधक एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही मर्द आहोत. विकासाचा एजेंडा घेऊन जनतेपुढे जाऊ आणि बहुमत मिळवू, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असेही गडकरी म्हणाले. तसेच सर्व विरोधक आता एकत्र दिसत असले तरी जागावाटपाच्या मुद्यांवरून त्यांचा पोळा फुटेल असे सांगत विरोधकांचाही समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज बांधणी, नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे पत्रकारपरिषद घेतली. पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात सरकारने केलेल्या कामाची तपशीलवार माहिती दिली. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना गडकरी यांनी विरोधकांना धारेवर धरले. आता देशात सर्व विरोधक भाजपाच्या विरोधात एकत्र आले आहेत. भाजपा मजबूत झाला असा त्याचा अर्थ आहे. कधीकाळी एकमेकांची तोंडेही न बघणारे विरोधी पक्षांतील नेते एकमेकांचे हात हलविताना दिसत आहे. मात्र, त्यांची एकी फार काळ टिकणार नाही. निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्यावरूनच हा पोळा फुटेल, अशा शब्दात गडकरी यांनी विरोधकांवर तोफ डागली. देशात सर्व पक्षांनी विकासाच्या विषयावर राजकारण करायला हवे मात्र काही लोक सांप्रदायिकता वाढवित आहेत. दलित, मुस्लिम समाजाला भीती दाखविली जात आहे. सरकार घटना बदलविणार असल्याच्या भ्रम निर्माण केला जात आहे. पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे पोटनिवडणुकांमध्ये फटका बसला असला तरी जनता पुन्हा आमच्यावरच विश्वास ठेवेल, असा आशावादही गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.






























































