
राज्य सरकारने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र विद्यार्थी, पालकांना प्रवासाची परवानगी नसल्याने संस्थेत कसे दाखल व्हायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई परिसरात विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही लोकल प्रवासाची मुभा नसल्याने संस्था सुरू झाली तरी विद्यार्थी येणार कसे? ही समस्या उभी राहिली आहे.
काwशल्य विकास व उद्योजकता विभागाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आयटीआयचे अनेक अभ्यासक्रम हे प्रॅक्टिकल्सवर आधारित असतात. हे विषय प्रॅक्टिकल शिकविल्याशिवाय विद्यार्थ्यांना समजणारे नाहीत. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होणाऱया प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या दृष्टीनेदेखील संस्था सुरू होणे आवश्यक असून संस्था सुरू करताना कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
लोकल प्रवासाची परवानगी द्या!
आयटीआय कर्मचारी, प्रशिक्षणार्थींना लोकलने प्रवासाची मुभा द्यावी. आयटीआयचे ट्रेनिंग हे कौशल्यपूर्ण असते आणि या काळात संस्था बंद असल्यामुळे सर्वच प्रशिक्षणार्थी प्रॅक्टिकलपासून वंचित आहेत.
येत्या काही दिवसांतच त्यांना परीक्षेला सामोरे जायचे असल्याकारणाने त्यांचे प्रशिक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे असोसिएशन ऑफ नॉनगव्हर्नमेंट आयटीआय महाराष्ट्रचे देवेंद्र पाटणे यांनी सांगितले.


























































