मस्तीखोर खेकड्यांच्या नांग्या ठेचायची वेळ आता आलीय; रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

धाराशिवमध्ये एका सभेत एक वृद्ध शेतकरी आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलण्याची परवानगी मागत होता. त्यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्या वृद्ध शेतकऱ्याशी अरेरावीने वागले. तसेच त्या शेतकऱ्याला काहीही बोलू न देता पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. मस्तीखोर खेकड्यांच्या नांग्या ठेचायची वेळ आता आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना इशरा दिला आहे.

या घटनेबाबत रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एका वृध्द शेतकऱ्याला अरेरावीची भाषा वापरणं ही सत्तेची मस्ती आहे. आम्ही काहीही करू शकतो, अशाप्रकारे सत्तेची नशा या गद्दारांच्या डोक्यात भिनलीय. परवा एकाने तर पोलीस कर्मचाऱ्यालाच गाडी धुवायला लावली, दुसऱ्या एकाने अधिकाऱ्याला शिवीगाळ केली, एक बेडूक तर अधिकाऱ्याशी अत्यंत खालच्या भाषेत भांडत होता…

अशा मस्तीखोर खेकड्यांच्या नांग्या ठेचायची वेळ आता आलीय आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता हे काम नक्की करेल. जनता यांना असं ठेचेल की यांच्या उलट्या-ताप आणि सत्तेची गुर्मी हे सगळं उतल्याशिवाय राहणार नाही, असेही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.