जे. जे. रुग्णालयातील रिक्त पदे भरा! वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या बैठकीत कर्मचारी संघटनांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे. जे. रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत. ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता सरळ सेवेने भरण्यात यावीत. गट ‘ड’ कर्मचाऱयांची रखडलेली पदोन्नती करण्यात यावी. वारसा हक्काची पदे भरण्यात यावीत, अशा मागण्या वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत कर्मचारी संघटनांकडून करण्यात आल्या.

वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या बैठकीत कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. डॉ. दिलीप म्हैसकर यांनी कर्मचाऱयांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस सहसंचालक डॉ. विवेक पाकमोडेसर, मुख्य प्रशासकीय अधिकारी  दिघावकर, प्रशासकीय अधिकारी माने, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंके, कोषाध्यक्ष राक्षे, कामा रुग्णालयाचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम, जे. जे. रुग्णालय संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ राणे व पुणे, कोल्हापूर येथील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचाऱयांना भेडसावणाऱया समस्यांवर सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर मागण्या सोडविण्यात येतील असे सांगण्यात आले.