डॉ. चंदनवाले यांच्या ‘पुणे पॅटर्न’मुळे ‘जे.जे.’तील विद्यार्थी बिथरले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

तीनच महिन्यांपूर्वी सर जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी आलेले डॉ. अजय चंदनवाले यांची सुरुवातच वादळी झाली आहे. ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. चंदनवाले आणि प्रशासनावर मानसिक छळाचा आरोप केला असून डॉ. चंदनवाले यांनी संस्काराच्या ‘पुणे पॅटर्न’चा अतिरेक केल्यानेच विद्यार्थी बिथरल्याची गंभीर बाब चौकशी समितीने नोंदवली आहे. विद्यार्थ्यांवरही या समितीने ताशेरे ओढले आहेत.

ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. चंदनवाले आणि प्रशासन मानसिक छळ करीत असल्याची तक्रार 29 मार्च रोजी केली होती. वैद्यकीय संचालनालयाने याची गंभीर दखल घेत डॉ. कानन येळीकर, डॉ. प्रकाश वाकोडे आणि डॉ. कालिदास चव्हाण या तिघांची समिती चौकशीसाठी नेमली. या समितीने 8 एप्रिल रोजी अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी व अन्य कर्मचारी अशा 30 जणांची चौकशी केली. या चौकशीचा अहवाल नुकताच सादर झाला. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या.

डॉ. चंदनवाले हे नुकतेच पुण्याहून मुंबईत आले आहेत. त्यांनी मुंबईचे वातावरण पुण्यापेक्षा वेगळे असू शकते हे समजून घेतले नाही व संस्कारी पॅटर्नचा अतिरेक केला असे नमूद केले आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र बसू नये, विद्यार्थिनींनी तोकडे कपडे घालू नयेत, उशिरापर्यंत अभ्यासाविषयी असले तरी एकमेकांशी बोलू नये यांसारखे अनेक फतवे प्रशासनाने काढल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. याबाबत समितीने सखोल चौकशी केली. त्यात काही तक्रारींत तथ्य आढळले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना अभ्यासाविषयी चर्चा करीत असताना सुरक्षारक्षक हटकताना दिसत असलेली व्हिडीओ क्लिपिंग्ज विद्यार्थ्यांनी समितीकडे सादर केल्या. याविषयी समितीने प्रशासनाचे कान उपटले आहेत. समितीने काही शिफारशी केल्या आहेत. त्या विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील कटुता दूर करून सौहार्दाचे वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सुचवले आहे. लेडीज हॉस्टेलच्या वॉर्डन डॉ. शिल्पा पाटील व विद्यार्थिनींचे संबंध तणावपूर्ण असल्याने वॉर्डन बदलण्याचे निर्देश दिले आहेत.