
‘मैं इंडियन आर्मी का हूं, मुंबई मै न्यूक्लीयर बॉम्बसे हमला होनेवाला है…’ असा मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणारा कॉलर मानसिक रुग्ण आहे. जीतेश ठाकूर असे त्याचे नाव असून तो जबलपूर येथे राहणारा आहे. अशाच प्रकारचा कॉल केल्याप्रकरणी तेथील स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले आहे. सुशिक्षित असलेल्या जीतेशने अनेक ठिकाणच्या पोलिसांना कॉल करून बॉम्बहल्ला होणार असल्याचे सांगितले होते.
गेल्या गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला कॉल आला आणि कॉलरने तो इंडियन आर्मीचा असल्याचे सांगितले. जबलपूर येथून बोलणाऱ्या जीतेश ठाकूर याने मुंबईमे न्यूक्लीयर बॉम्बसे हमला होनेवाला है. मुंबईच्या कुर्ला, सीएमएमटी रेल्वे स्थानक तसेच शाहरुख खानच्या घराजवळ आणि खारघर सेक्टर-35 येथील गुरुद्वाराजवळसुद्धा बॉम्बहल्ला होणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर तत्काळ सुरक्षा यंत्रणांना अॅलर्ट करून संबंधित ठिकाणी बॉम्ब स्कॉड तसेच श्वानपथकाकडून कसून तपासणी करण्यात आली होती. या फोनमुळे वातावरण गंभीर झाले होते. पण नंतर कॉल करणारा जबलपूर येथील असून तो मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले.
जीतेश ठाकूर हा सुशिक्षित आहे. पण त्याचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. जीतेशने अनेक ठिकाणच्या पोलिसांना फोन करून विविध ठिकाणी बॉम्बहल्ला होणार असल्याचे सांगितले होते. तो राहतो तेथील पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. विविध ठिकाणचे पोलीस जीतेशचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.




























































