
बॉलीवूडमध्ये काही अभिनेते असे आहेत जे आपल्या अभिनयासोबतच साधेपणामुळेदेखील चर्चेत असतात. अभिनेता जॅकी श्रॉफ हा त्यापैकीच एक. आपल्याकडे घरकाम करणाऱया तरुणीच्या आजीचे निधन झालेय हे कळताच जॅकी श्रॉफ तिच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मावळमध्ये पोहोचले. आपले सेलिब्रेटी स्टेटस बाजूला ठेवून सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर बसून तिच्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी केली. त्यांच्या या वागण्याचे सगळय़ांनाच अप्रूप वाटले.
जॅकी श्रॉफ यांचा एक बंगला मावळमधील चांदखेड येथेही आहे. कामामधून वेळ काढून ते सुट्टी घालवण्यासाठी येतात. अशाच एका भेटीदरम्यान त्यांना घरकाम करणाऱया दीपाली तुपेच्या आजीच्या म्हणजेच तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाबद्दल समजले. त्यानंतर जराही वेळ न दवडता त्यांनी ठाकर कुटुंबाचे घर गाठले आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबातीलच एखाद्या सदस्याप्रमाणे थेट जमिनीवर बसून त्यांची विचारपूस केली. तान्हाबाई शंभर वर्षे निरोगी आयुष्य कशा जगल्या याची माहिती घेतली. त्यांचा दैनंदिन जीवनक्रम जाणून घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. एवढेच नाही तर कुटुंबातील वडीलधाऱयांच्या पाया पडून आशीर्वादही घेतले. एवढा मोठा माणूस आपल्या घरी आपले सांत्वन करण्यासाठी आला आहे हे पाहून ठाकर कुटुंबीयदेखील भारावून गेले.



























































