हातातली पैशांची बॅग क्षणात लंपास करणाऱ्या जादूगर बंटी, बबलूला अटक

87

सामना ऑनलाईन | मुंबई

रेल्वे स्थानकात पैशांची बॅग घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला अचूक हेरून त्याच्या हातातली बॅग क्षणात लंपास करून पसार होणाऱ्या जादूगर बंटी बबलूला रेल्वे क्राईम ब्रँचने बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दीड लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

चेतन दोशी (५०) हे व्यावसायिक मस्जिद बंदर स्थानकातील फूट ओव्हर ब्रिज चढत असताना त्यांच्या हातातील साडेचार लाख रूपये असलेली पिशवी अज्ञात इसमांनी हिसकावून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या विशेष कृती दलाने समांतर तपास सुरू केला. आरोपी गुन्हा केल्यानंतर अजमेरला पळून गेल्याची पक्की खबर कॉन्स्टेबल बाबा चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण, सतीश क्षीरसागर, विजय ढवळे, प्रवीण घार्गे, महादेव शिंदे, सुरेश येला, मोहन जाधव, आदींच्या पथकाने अजमेर गाठले. तेथील जवळपास २५० लॉज तपासले, पण आरोपींचा शोध लागला नाही. आरोपी दिल्लीच्या पहाडगंज येथे गेल्याचे समजल्यावर पोलीस तेथे धडकले. तेथील १५० लॉज तपासले तरी आरोपी सापडले नाहीत. अखेर तेथील हरी मस्जिद परिसरात आरोपी येणार असल्याचे कळताच तेथे सापळा रचून बबलू इस्माईल शेख याला पकडले. मग त्याचा साथीदार बंटीला ठाण्यात पकडले. दोघांनीही गुह्याची कबूली दिली.

नंगा पत्ता, धूर अन् डाव प्रवाशाच्या हातात असलेल्या पैशांच्या पिशवीला नंगा पत्ता असे हे चोर म्हणतात. मग पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला धूर जा रहा है, असे बोलले जाते. इस धूर का काम बजाना है असे सांगून एकमेकांना तयार राहण्यास सांगितले जाते. त्यानंतर योग्य जागा बघून संबंधित टार्गेट आरोपी घेरतात. त्यानंतर डाव लेना है तयार रहो (हातातली पिशवी खेचायची आहे) असे सांकेतिक भाषेत सांगितले जाते. मग संधी साधून जादूगर बंटी-बबलू त्यांचे काम फत्ते करतात.

फिल्डिंग लावून लुटमार

> रेल्वे हद्दीत बबलू त्याच्या साथीदारांच्या मदतीने गुन्हे करतो. टोळीचा म्होरक्या असलेल्या बबलू सोबत बंटी, फिरोज, रफीक, विनायक, बुलेट यांच्या मदतीने प्रंवाशांच्या हातातील किमती ऐवज अथवा पैशांची पिशवी शिताफीने हिसकावून नेतात.
> स्टेशन बाहेरून स्टेशनमध्ये येणाऱ्या व ज्याच्या हातात किंमती ऐवज अथवा रोकड आहे अशा प्रवाशांना रफिक अचूक हेरतो.
> रफिकने त्या व्यक्तीकडे इशारा केल्यानंतर विनायक हा मोठी पिशवी घेऊन त्याच्या जवळ जातो.
> त्यानंतर बंटी आणि बबलू, बुलेट हे तिघे सावज आहे त्या व्यक्तीला घेरतात
> त्याचवेळी विनायक त्याच्याकडील मोठी पिशवी खोलून चालत असतो.
> बबलू मग शिताफीने पिशवी खेचतो आणि विनायकच्या पिशवीत टाकतो.
> त्यानंतर फिरोज व त्याचे इतर साथीदार पीडित व्यक्तीला घेराव घालून चोर इकडे तिकडे पळाला असे सांगून दिशाभूल करतात.

आपली प्रतिक्रिया द्या