जगनमोहन रेड्डींची आंध्रला विशेष दर्जा देण्याची मागणी, नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीत एनडीएला दणदणीत यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर रेड्डी यांनी रविवारी नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या. दरम्यान, 30 मे रोजी आपण विजयवाडा येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगत त्यांना निमंत्रणही दिले.

मोदी आणि शहा यांची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांनी त्यांना आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत विचारले. यावर एनडीएला 250 जागांपर्यंतच मजल मारता आली असती तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवरच आम्ही त्यांना समर्थन देऊ अशी मागणी करता आली असती, परंतु आता परिस्थिती वेगळी असल्याचे उत्तर त्यांनी दिले. जगनमोहन यांची रविवारी पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर जगनमोहन यांनी केंद्रात जे सरकार आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देईल त्यांना पाठिंबा देऊ अशी घोषणा केली होती.

तर ‘त्या’ अटीवरच एनडीएला समर्थन दिले असते
भाजपला केवळ 250 जागा मिळाल्या असत्या तर आम्हाला केंद्र सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या अटीवरच एनडीएला आम्ही समर्थन दिले असते, परंतु आता त्यांना आमची गरज नाही. कारण भाजप सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, असेही रेड्डी यांनी यावेळी सांगितले.

एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा
एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याबद्दलही रेड्डी यांनी मोदी यांच्याबरोबर यावेळी चर्चा केली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही रेड्डी यांनी यावेळी शहा यांच्याकडे केली. यावेळी वायएसआर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व्ही. विजय साई रेड्डीदेखील उपस्थित होते.