
सामना प्रतिनिधी, खेड
रविवार रात्रीपासून पावसाने पुन्हा मुसळधार बरसायला सुरवात केली असल्याने खेड तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली असल्याने सकाळी 9.30 वाजल्यापासून जगबुडी पूल पुन्हा एकदा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जगबुडी प्रमाणेच नारिंगी नदीलाही पूर आला असल्याने खेदाची बाजारपेठ पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड बहिरवली मार्गावरील कमी उंचीचा सुसेरी पूल पाण्याखाली गेल्याने खाडीपट्टा परिसरातील सुमारे 15 गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. या मार्गावरील सुसेरी बौद्धवाडी परिसरात नारिंगी नदीचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असल्याने महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. तालुक्यातील शेल्डी येथे रस्त्यावरील मोरी खचल्याने या परिसरातील नागरिकांचे दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोय झाली आहे. खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने खेड चिपळूण मार्गही वाहतुकीस बंद आहे.
गेले तीन चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवार रात्रीपासून पुण्य मुसळधार बरसायला सुरवात केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्रभर कोसळल्या पावसाने खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नंद्याच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाले. पहाटेच्या सुमारास जगबुडीचे पाणी पूररेषा ओलांडून शहराकडे उसळी मारू लागले. पुराचे पाणी मटण मार्केटपासून बाजारपेठेकडे झेपावू लागल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरवात केली. खेड दापोली मार्गावरील नारिंगी नदीचे पाणीही दापोली नाक्यावरील सुर्वे इंजिनिअरिंग पर्यंत आल्याने खेड दापोली मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे दापोली आणि मंडणगड मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
पावसाचा जोर वाढतच राहिल्याने शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. ग्रामीण भागातून जे विद्यार्थी सकाळी शहरात आले होते. त्यांना तात्काळ घरी परतण्याच्या सूचना शाळा व महाविद्यालयांकडून करण्यात आल्या. संततधार पावसाचा परिणाम एसटी सेवेवरही झाला. खाडीपट्टा परिसरात वस्तीला गेलेल्या बसेस सकाळी वेळेत न परत आल्याने एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले. त्यामुळे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
पाऊस सुरु झाल्यापासून यावर्षी जगबुडी पूल चौथ्यांदा वाहतुकीसाठी बंद करावा लागला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पूल वाहतुकीस बंद केल्यावर रात्रं-दिवस पुलाच्या दोन्ही बाजूना पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत असल्याने प्रशासनावरही ताण येत आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेला जगबुडी नवा पूल वेळेत पूर्ण झाला असता आणि झालेले काम दर्जेदार झाले असते तर जगबुडी पुलावरचा धोका कायमचा टाळता आला असता मात्र मुजोर ठेकेदार आणि बेमुर्वत अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे प्रशासन आणि प्रवाशी वेठीस धरले गेले आहेत. जगबुडी पूल वाहतुकीस वारंवार बंद होण्यास संबधीत ठेकेदार कंपनी आणि अधिकारीच जबाबदार असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




























































