जगबुडीचे प्रदूषण मगरींच्या जीवावर, महिन्याभरात दोन महाकाय मगरींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीतील प्रदूषण नदीपात्रातील महाकाय मगरीच्या जीवावर उठले आहे. गेल्या दोन महिन्यात या नदीपात्रात दोन महाकाय मगरी मृतावस्थेत आढळून आल्या. काल मृतावस्थेत आढळून आलेली मगर नदीपात्रातून बाहेर काढणे शक्य न झाल्याने तिला नदीपात्रात चिता रचून अग्नी देण्यात आला.

खेड शहराची ऐतिहासिक ओळख असलेली जगबुडी नदी सध्या कचराकुंडी झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने नदीपात्रात प्लास्टिकच्या बाटल्या तसेच अन्य टाकाऊ वस्तूंचा खच पडलेल्या दिसू लागला आहे. परिणामी जगबुडीचा श्वास कोंडला गेला आहे. जगबुडी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी येथील अल सफा या संघटनेने सेव जगबुडी रिव्हर ही चळवळ सुरू केली आहे. मात्र नदीपात्रात कचरा फेकणाऱ्यांना थांबविण्यात अद्याप यश आलेले नाही.

जगबुडी नदीच्या डोहात मोठ्या प्रमाणात जलचर पाहावयास मिळतात यामध्ये मगरींचाही मोठ्या प्रमाणत समावेश आहे. देवणे येथील डोहामध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असल्याने या ठिकाणी क्रोकोडाईल पार्क बनविण्याचे प्रस्तावित आहे. मात्र नदीतील प्रदूषणामुळे डोहातील मगरी मरु लागल्या असल्याने क्रोकोडाईल पार्क पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटंकाना पाण्यात मुक्तपणे विहार करणाऱ्या मगरींचे दर्शन कसे होणार हा प्रश्न आहे. गेल्या महिन्यात याच नदीपात्रात एक महाकाय मगर मृतावस्थेत आढळून आली होती. त्या नंतर आता पुन्हा महाकाय मगर मृतावस्थेत आढळून आल्याने मगरीच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जगबुडी नदीत प्रदूषण होणार नाही याची खबरदारी नगरपालिका प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. नदीत कचरा टाकू नये यासाठी जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. मात्र नगरपालिकेकडून तसा कोणताच उपक्रम राबविला जात नसल्याने एकेकाळी स्वच्छ असलेल्या जगबुडीची अक्षरशः कचरा कुंडी झाली आहे. नदीतील गाळ आणि अन्य कचऱ्यामुळे पाण्याच्या पुष्ठभागावर मोठ्या प्रमाणात तवंग पसरलेले पाहावयास मिळत असून या तवंगामुळेच पाण्यातील जलचरांचे जीव धोक्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा टॅक्टरमध्ये भरून नदीपात्रात फेकला जात असल्याचा एक विडिओ वायरल झाला होता. यानंतर प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत आवाज उठविण्याच्या प्रयत्न केला होता, मात्र प्रशासनच काही कारवाई करत नसल्याने प्रदूषणामुळे जगबुडी नदी दिवसेंदिवस गुदमरतच चालली आहे. जगबुडी नदीत होणार प्रदूषण थांबले नाही तर या नदीच्या डोहात एकही मगर विहार करण्यासाठी शिल्लक राहणार नाही असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही

जगबुडी नदीपात्रात मृत मगर आढळून आली असतानाच खेड दापोली मार्गावरील नारिंगी नदीत मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात महाकाय मगर अडकल्याचे आढळून आली. येथील प्राणिमित्रांनी अडकलेल्या त्या मगरीला महत्प्रस्यांसाने बाहेर काढून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.