सरकारचा दबाव, राजकीय वाद, अविश्वास प्रस्तावाचा इशारा की प्रकृती अस्वास्थ? धनकड यांच्या राजीनाम्यावरून तर्कवितर्क सुरू

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी प्रकृती अस्वस्थाचे कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला असून राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. आता धनकड यांच्या राजीनाम्यामागे राजकीय वाद असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोगाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. त्यानंतर सरकारकडून त्यांना आलेला कॉल आणि त्यावेळी वाद झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे सरकारचा दबाव, राजकीय वाद, अविश्वास प्रस्तावाचा इशारा की प्रकृती अस्वास्थ नेमक्या कोणत्या कारणाने धनकड यांनी राजीनामा दिल्या याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

केंद्र सरकारकडून धनखड यांना एक फोन कॉल आला आणि त्यानंतर वादविवादाला सुरुवात झाली. या कॉलनंतर धनखड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (21 जुलै) विरोधकांनी न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याविरोधात प्रस्ताव सादर केला होता. धनखड यांनी ती नोटीस स्वीकारली आणि संसद सचिवालयाला कारवाईचे आदेश दिले. यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर नाराज झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फोनवरील संभाषणात धनखड यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आणि चर्चेचे स्वरूप वादात बदलले, असेही सूत्रांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याच्या चर्चा सुरू झाल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच धनखड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कार्य मंत्रणा समितीच्या बैठकीसाठी मंत्री जे. पी. नड्डा आणि किरेन रिजिजू गैरहजर होते. ही माहिती धनखड यांना आधीच दिली गेली नव्हती, त्यामुळे त्यांना दुख झाला, असा दावा जयराम रमेश यांनी केला.