
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी हिंदुस्थानच्या सैन्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर देशभरातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पंतप्रधानांच्या चरणात हिंदुस्थानचे सैन्य नतमस्तक असल्याचे वादग्रस्त विधान जगदीश देवडा यांनी केले आहे. यावरून विरोधी पक्षही संतापले आहेत. जगदीश देवडांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी करत काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला आहे.
देशाचं सैन्य पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक, मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
हिंदुस्थानचे सैन्य आणि जवान पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक होतात, असे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा म्हणाले. देशातील कोणताही व्यक्ती असे बोलू शकत नाही. आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैन्याने पाकिस्तानला खणखणीत उत्तर दिले आहे. आपल्या सैन्याबद्दल अशी भाषा वापरणे हे महापाप आहे आणि भाजप नेते सतत हे पाप करत आहेत. भाजपमध्ये वीरांचे नाही तर फितुरांचे रक्त आहे, असा घणाघात काँग्रेसने केला.
कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाहला भाजप का पाठीशी घालतंय?
आपल्या सैन्याबद्दल इतका द्वेष असलेल्या व्यक्तीला कोणत्याही पदावर ठेवणे चुकीचे आहे. आता अशा व्यक्तीला हटवाले लागेल. पुढील काही तासांत त्यांची पदावरून हकालपट्टी झाली नाही तर मोदीजींचीही अशीच विचारसरणी आहे हे स्पष्ट होईल, असे काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्यापूर्वी राज्याचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले होते. शाह यांच्या घृणास्पद वक्तव्याने संपूर्ण देशात संताप उसळला. देशात प्रत्येकाच्या मनात सैन्याबद्दल सन्मान आणि आदर आहे. संपूर्ण देश त्यांचा आभारी आहे. सैन्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. त्यामुळे यावेळी माफी मागून चालणार नाही. भाजप मूकपणे हे पाहू शकत नाही. पंतप्रधानांनी मौन बाळगू नये, असा हल्लाबोल काँग्रेसने केला.