
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे,[email protected]
नवरात्रात शक्तिदेवतांचे संकीर्तन होते ते गोंधळाच्या रूपाने. गोंधळ हा महाराष्ट्रातील कुळधर्म-कुळाचार असून विधिनाटय़ म्हणूनही ओळखले जाते. नवरात्रात कदमराई गोंधळय़ांचा आख्यानाचा गोंधळ आणि रेणुराई गोंधळय़ाचा आरतीचा गोंधळ हमखास सादर केला जातो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी ही शक्तिदेवतेची साडेतीन शक्तिपीठे असून तिथे गोंधळ सादर होत असतो.
गणांचे दल सादर करते तो ‘गोंधळ’. गोंधळाला ‘गौंडली नृत्य’ अथवा ‘गोंडली नृत्य’ असेही म्हटले जायचे. भूतमातेच्या महोत्सवात गोंडली नृत्य सादर केल्याचे उल्लेख ‘नृत्यरत्नावली’ या ग्रंथात आहे. लग्न-मुंजीच्या प्रसंगी खंडोबाच्या जागरणाबरोबरच देवीचा गोंधळ घातला जातो. परशुराम हा आपला मूळ पुरुष असल्याचे गोंधळी सांगतात. आपली उत्पत्ती जमदग्नी आणि रेणुका यांच्यापासून झाली आहे अशी त्यांची धारणा असते. ‘रेणुकामहात्म्या’त अशी कथा आहे की, परशुरामाने बेटासुर नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर त्याचे शीर तोडले, त्या शिराच्या ब्रह्मरंध्रात त्याच्याच शिरांचे तंतू ओवले आणि ते खांद्यावर घेऊन ‘तिंतृण तिंतृण’ असा ध्वनी काढीत तो मातेजवळ आला. बेटासुराच्या धडाचे आणि शिरांचे बनविलेले चौंडके वाजवून परशुरामाने जे पहिले मातृवंदन केले, त्यातच गोंधळाची प्रथा उगम पावली.
गण, देवतांना आवाहन, देवीमाहात्म्य, कथा आणि आरती हा गोंधळाचा आविष्कार क्रम असतो. भागवत संप्रदायी संतांनी आध्यात्मिक उद्बोधनासाठी गोंधळाचे रूपक घेतले. संत एकनाथांनी गोंधळावर रूपक केले आहे ते असे-
सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो।
ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो।।
चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो।
घालूनी सिंहासन वरूते घट स्थापियेला वो।।1।।
उदो बोला उदो उदो सद्गुरू माऊलीचा वो।।धृ.।।
प्रवृत्ती निवृत्तीचें घालुनी शुद्धासन वो।।
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिले चरण वो।।
कायावाचामनें एकविध केलें अर्चन वो।
द्वैत अद्वैत भावें दिलें आचमन वो।।2।।
भक्ति वैराग्य ज्ञान यांही पूजियेली अंबा वो।
सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो।
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो।
त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो।
कुंभ-निकुंभाला शिवाचे वरदान लाभलेले असल्यामुळे त्यांचे रक्तबिंदू भूमीवर पडताच त्यातून नवनवे राक्षस निर्माण होत असत. म्हणून त्यांचे रक्तबिंदू भूमीवर पडण्यापूर्वी प्राशन करण्यास ही भुतावळ युद्धास सिद्ध होते. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर या भुतावळीचे कार्य सुरू होते.
‘किंकाळिया नादें गर्जती । करीं रुधिरापात्रें झेलितीं।
हर्षें गोंधळी नाचती। सत्यादेवी पुढां।।406।।
येथे कृष्णदासाने भुतांच्या नृत्याला ‘गोंधळ’ अशीच संज्ञा वापरली आहे.
संतकवी शेख महंमद श्रीगोंदेकर यांच्या ‘योगसंग्राम’ या ग्रंथात आलेल्या उल्लेखांतून हेच सत्य स्पष्ट होते. शेख महंमद म्हणतात –
आता ऐका गोंधळाचे व्यवधान ।
हांकारी समस्त भुतांलागून।
अनेक अनेक करूनी बरळण।
रंगणी अवतरत असे ।।
घडिक हजिवंत होत मल्लिकाचे ।
घडिक गोंधळे होऊनि नाचे।
तेथे उच्चार करी अनेक भुतांचे।
हाती ताट घेऊनियां।।97।।
म्हणे यमाई नानाई गोंधळा यावे।
आपला रंग भोग घेऊनी जावें।
ऐसी बाष्कळ बरळोनियां नांवे।
बेइमानी होतसे।।98।।
गोंधळी नाचवीत असे ऐ देवा।
अनेकांस म्हणे रंगभोग न्यावा।
ऐसी ही पहा अधर्माची ठेवा।
जन उन्मत्त करीत असे।।99।।
गोंधळी करीत असलेल्या शक्तिकुळातील विविध देवतांच्या आवाहनाला ‘बाष्कळ बरळणे’ असे शेख महंमद श्रीगोंदेकर यांनी संबोधले आहे. त्यातून शेख महंमदांची भूमिका शक्तिदेवतांच्या अधिक्षेपाची नाही. उपासनेतील अपप्रवृत्तींवर मात्र त्यांनी प्रहार केला आहे. गोंधळ हे भूतपिशाच्चांच्या नृत्याचे अनुकरण करणारे एक उपासनानृत्य आहे.
पाच उसांच्या मखरात देवीचा घट बसवून संबळ, तुणतुणे, मंजिरी या वाद्यांच्या साथीने देवीच्या अवताराचे माहात्म्य सांगून एखादी कथा नाटय़रूपाने सादर करणे म्हणजे गोंधळ घालणे होय. मुंबईतदेखील विविध जातीजमातींमध्ये गोंधळ घालण्याचा कुळधर्म-कुळाचार आहे. मुंबईत आरतीचा गोंधळ घालणारे गोंधळीदेखील आहेत. डवरी, गोसावी, मुरळीदेखील उपजीविकेचे साधन म्हणून गोंधळ सादर करतात. परभणीचे गोंधळमहर्षी राजाराम भाऊ कदम यांनी गोंधळ आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केला. त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा हिंदुस्थान सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. तसेच पॅरिस येथे हिंदुस्थान महोत्सवात त्यांनी आयफेल टॉवरसमोर गोंधळ सादर केला होता. त्यांच्या घरी सात पिढय़ांच्या गोंधळाची परंपरा असून ते कदमराई गोंधळी आहेत. ‘जांभूळ आख्यान’ ही गवळणदेखील राजाराम भाऊ सादर करीत असत. त्यात राधेचे वात्सल्य आणि शृंगार या दोन्ही छटा आपल्या आहार्य, आंगिक, वाचिक अभिनयातून उभे करीत असत. एकूणच गोंधळ हे महाराष्ट्राचे भूषण असून कुळधर्म-कुळाचार म्हणून आजही गोंधळाची लोकप्रियता कायम आहे.
























































