
पाचवीला पुजलेली गरिबी. राहायला 75 चौरस फुटांची झोपडी. वडिलांपासून फारकत झाल्याने फक्त आईचाच आधार. भरल्या ताटाचे दर्शन कधीतरीच होते. वडापाव आणि तत्सम खाद्यपदार्थांवरच पोटाची खळगी भरून आयुष्याची गाडी कशीबशी चालवत राहायची. अशा परिस्थितीतही कुर्ल्याचा 24 वर्षांचा जयकुमार वैद्य संशोधक बनला आणि त्याच्या संशोधनाची दखल घेऊन जगातील श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेने त्याची पीएच.डी.साठी निवड केली. आजच तो अमेरिकेला रवाना झाला.
गरिबी हे एक संकट आहे, पण त्या संकटातही न डगमगता आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटणाऱया व्यक्ती यश आपल्या कवेत घेऊ शकतात हे जयकुमारने आपल्या जिद्द आणि मेहनतीमधून दाखवून दिले. कुर्ला पश्चिम येथील हलाव पुलाजवळील विजय भुवन चाळीत राहणाऱया वैद्य कुटुंबात जयकुमार आणि त्याची आई नलिनी असे दोघेच राहतात. दुर्दैवाने नलिनी यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्यावरच जयकुमारची जबाबदारी आली. या मायलेकांना नवे कपडे विकत घेण्याचीही ऐपत नसल्याने सेकंड हॅण्ड कपडेच वापरावे लागत होते. पैशांअभावी जयकुमारला शाळेच्या सहलीला जाता आले नाही. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाणे, सिनेमा पाहणे हेसुद्धा त्याला शक्य झाले नाही.
पंधरा लाख रुपये विद्यावेतन मिळणार
इंजिनीयरिंगनंतर टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये (टीआयएफआर) कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून तो नोकरीला लागला. तिथे खऱया अर्थाने त्याच्या करीयरला वाव मिळाला. त्याचे संशोधन अहवाल 2017 आणि 2018 मध्ये नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. त्याच आधारावर अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाने त्याला पीएच.डी.साठी आमंत्रित केले. त्याला वर्षाला 15 लाखांवर विद्यावेतन मिळणार आहे. हार्डवेअर तंत्रज्ञानामध्ये आपला देश समर्थ व्हावा अशी त्याची इच्छा असून येत्या दोन वर्षांत आपल्या आईलाही अमेरिकेला आणण्याचे त्याचे स्वप्न आहे.
डिस्कव्हरी वाहिनी बनली प्रेरक
एका मंदिराच्या ट्रस्टने जयकुमारच्या शिक्षणासाठी मदत केली. सोमय्या महाविद्यालयातून त्याने इंजिनीयरिंगची डिग्री घेतली. महाविद्यालयात असतानाच रोबोंच्या संशोधनासाठी त्याला तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार राज्य पुरस्कारही मिळाले. घरामध्ये सेकंड हॅण्ड टीव्ही मनोरंजनासाठी होता. शिक्षण घेतल्याशिवाय आपली परिस्थिती सुधारणार नाही असे आईने जयकुमारच्या मनावर ठसवले होते. डिस्कव्हरी वाहिनी पाहून संशोधक बनण्यास प्रेरणा मिळाली असे जयकुमार सांगतो.


























































