कश्मीरनंतर या शहरात कलम 144 लागू

497

सामना ऑनलाईन। जयपूर

जम्मू-कश्मीरनंतर राजस्थानमधील जयपूर येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून य़ेथे जातीय दंगली उसळल्या असून अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दोन गटातील वादांमुळे हा हिंसाचार उसळला आहे.

जयपूरमधील गलता गेट, सुभाष चौक, ब्रम्हपुरी, कोतवाली, संजय चौक, नाहरगढ, शास्त्री नगर भट्टा बस्ती, आदर्श नगर , मोती डुंगरी लाल कोठी जवाहर नगर यासह विविध ठिकाणी समाजकंटक आपापसात भिडल्याने या भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. रस्त्यांवर काचांचा खच पडला असून हिंसक जमावाने लावलेल्या आगीत रस्त्यावर उभे असलेली वाहने भक्ष्यस्थानी पडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात येथे दोन समुदायांमध्ये क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. मात्र सोमवारी रात्री या वादाचे रुपांतर दंगलीत झाले.

यावेळी हिंसक जमावाने दिल्ली हायवे ठप्प केला. हरिद्वारला जाणाऱ्या एका प्रवासी बसवर दंगलखोरांनी तुफान दगडफेक केली. यात एका समुदायातील प्रवासी जखमी झाल्याची अफवा उसळली .त्यानंतर दुसऱ्या जमावातील नागरिकही रस्त्यावर उतरले. नंतर दोन्ही समुदाय आमने सामने आले व त्यांनी परस्परांवर दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

आपली प्रतिक्रिया द्या