मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाचा जीडीपी 8.1 टक्के होता, काँग्रेसचा भाजपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे वारंवार जुलै ते सप्टेंबर या दरम्यानचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आकड्यांवर बोलत आहेत. पण, यापेक्षा अधिक जीडीपी हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात होता, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपीच्या वृद्धीचे दर जाहीर केले होते. जागतिक स्तरावर मंदी असताना हिंदुस्थानने ही वृद्धी गाठणं हे अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे, असंही मोदी म्हणाले होते. त्यावर निशाणा साधताना काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी एक्स या समाजमाध्यमावरून निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान आणि अर्थ मंत्री वारंवार जुलै ते सप्टेंबर 2023च्या आकड्यांवर आधारित देशातील परिवर्तनकारी जीडीपी वृद्धीविषयी बोलून दाखवत आहेत. तिमाही विकास जाऊ द्या, कारण तो अनेक कारणांती सतत बदलत राहतो. अर्थव्यवस्थेच्या वास्तव परिस्थितीविषयी जाणून घ्यायचं असेल तर दीर्घकालीन वार्षिक विकास दराचा अभ्यास करावा लागतो, असं जयराम रमेश म्हणाले.

जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा हाच वार्षिक सरासरी वृद्धीदर 8.1 इतका होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आजवरचा हाच वार्षिक वृद्धीदर 5.4 टक्के इतका झाला आहे. मग हे खरोखर परिवर्तनकारी आहे का, असा प्रश्नही जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.