जालना जिल्ह्यातील देवपिंपळगावात माय-लेकाचा विहिरीत मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव शिवारात शेतातील घरातून निघून गेलेल्या माय – लेकराचा मृतदेह बुधवारी 22 जुलै रोजी सकाळी स्वतःच्या शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. मृत 25 वर्षीय विवाहित महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलासह मंगळवारी 21 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी 22 जुलै रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, बदनापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव शिवारातील शेतातील घरात राहणाऱ्या गोदावरी बाळासाहेब नन्नवरे (25) व त्यांचा मुलगा सार्थक बाळासाहेब नन्नवरे (5) दोघे मंगळवारी सकाळी सात वाजता आपल्या राहत्या घरातून निघून गेले होते. या संदर्भात त्यांचे पती बाळासाहेब गोरखनाथ नन्नवरे (30) यांनी दिलेल्या माहितीवरून मंगळवारी २१ जुलै रोजी सायंकाळी बदनापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी २२ जुलै रोजी सकाळी आई गोदावरी व मुलगा सार्थक यांचा मृतदेह स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना दिसून आला. या बाबत बाळू बबनराव नन्नवरे (रा. देवपिंपळगाव) यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, फौजदार पूजा पाटील, सहाय्यक फौजदार इब्राहिम शेख, निवृत्ती शेळके, बी. जी. खंडागळे, नितीन ढिलपे, गजानन जारवाल, अनिल चव्हाण या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तसेच घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, दोघा माय-लेकरांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तालुक्यातील शेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, काळजाला चटका लावणाNया या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार आत्महत्या की घातपात या बाबत बदनापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.