Jalana News – विना हेल्मेट शासकीय कार्यालयात नो एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये होणारी प्राणहानी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज एका विशेष परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना दुचाकी चालवताना ‘आय.एस.आय.’ मार्क असलेले हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे.

रस्ते सुरक्षेसाठी नागरिकांनी आणि शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. जालना मुख्यालयातील सर्व शासकीय कार्यालयांच्या अधिकारी – कर्मचार्‍यांना दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे आता अनिवार्य असेल. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तींनाच (कर्मचारी व अभ्यागत) प्रवेश दिला जाईल.
प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जाईल.

हेल्मेट नसलेल्या व्यक्तींना कार्यालय परिसरात वाहन लावण्यास सक्त मनाई असेल. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

कार्यालय प्रमुखांनी आपल्या कर्मचार्‍यांना या नियमाची माहिती देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍या अधिकारी -कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी आजपासूनच लागू करण्यात आली आहे.