मोठी बातमी – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, लाखो रुपयांची रोकड लुटली

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून चोऱ्या, घरफोडी, खून, बलात्कार, दरोडेखोरीचं सत्र सुरू आहे. सर्वसामान्य जनता यामुळे बेजार झालेली असतानाच आता केंद्रीय मंत्रीही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. बंदुकीचा धाक दाखवत पाच दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील लाखो रुपयांची रोकड लंपास केली.

रक्षा खडसे यांच्या मालकीचा मुक्ताईनगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी रक्षा ऑटो फ्युअल या नावाने पेट्रोल पंप आहे. गुरुवारी रात्री दोन दुचाकींवरून पाच जण पेट्रोल पंपावर आले. दरोडेखोरांनी दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लाऊन पेट्रोल पंपावरील सुमारे एक लाख रूपयांची रोकड लांबविली. तसेच पेट्रोल पंपाच्या परिसरात तोडफोड केली. दरोडेखोरांनी सीसीटिव्ही, प्रिंटर व संगणकासह अन्य सामग्रीचे नुकसान केले. अवघ्या काही मिनिटांमध्ये धुडगुस घालून हे पाचही जण तेथून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोर बोहर्डा-बोहर्डी गावाच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. फॉरेन्सीक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप हा शहराच्या मध्यातून जाणाऱ्या महामार्गाला लागून असल्याने दरोडेखोरांनी थेट बंदुकीचा धाक दाखवून येथे लूट केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मुक्ताईनक्षरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.