महिलेची भररस्त्यात प्रसूती, लुगड्याच्या आडोशाने दिला बाळाला जन्म; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांच्या माना शरमेने खाली जाव्यात अशी संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यात घडली. एकीकडे देश जगातील चौथी आर्थिक महासत्ता बनल्याचे ढोलताशे वाजत असतानाच आरोग्य यंत्रणेच्या मदतीअभावी एका लाडक्या बहिणीने चक्क रस्त्याच्या कडेला, लुगड्याच्या आडोशाला एका बाळाला जन्म दिला. महिलांनीच ही प्रसूती केली, बाळाची नाळ दगडाने ठेचली!

जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील बोरमळी या दुर्गम भागातील संताबाई बारेला या महिलेस प्रसूतिकळा सुरू झाल्या. संताबाईच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी धडपड केली. परंतु रुग्णवाहिका न मिळाल्याने शेवटी मोटारसायकलवरून वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ते निघाले. आरोग्य केंद्र फर्लांगभर अंतरावर असतानाच संताबाईच्या प्रसूतिवेदना भयंकर वाढल्या. त्यामुळे दोघे नवराबायको रस्त्याच्या कडेला थांबले. आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्सेसला निरोप दिला. परंतु त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

संताबाईच्या वेदना पाहून वैजापूर येथील काही महिला मदतीसाठी धावल्या. रस्त्याच्या कडेलाच महिलांनी लुगड्याचा आडोसा केला. एका अनुभवी महिलेने संताबाईची सुखरूप प्रसूती केली. दगडाने बाळाची नाळही ठेचली. प्रसूती झाल्यानंतरही आरोग्य केंद्राचे कर्मचारी आले नाहीत. जर गावातील महिलांनी वेळीच मदतीचा हात दिला नसता तर बाळ, बाळंतणीच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. परंतु नशीब बलवत्तर असल्याने दोघेही बचावले.

व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हाधिकारी हजर

आदिवासी महिलेची रस्त्याच्या कडेला, लुगड्याच्या आडोशाने प्रसूती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य प्रशासनासह खैरापाडा येथे भेट दिली. घोडाचापर येथून सात किमीचा चिखलाने बरबटलेला रस्ता तुडवून जिल्हाधिकार्‍यांनी खैरापाडा गाठले. आरोग्य मदतीअभावी रस्त्यावरच प्रसूती झालेल्या संताबाईची त्यांनी भेट घेतली.

फोन करूनही डॉक्टर आले ना नर्स. रस्त्यावरच महिलेची प्रसूती झाली. काय आपली व्यवस्था आहे? तब्बल अडीच तास बाळ, बाळंतीण रस्त्यावर होते. परंतु आरोग्य यंत्रणेला त्यांची दया आली नाही. या आदिवासी महिलेला मदत तर मिळायलाच हवी पण दोषी आरोग्य यंत्रणेवरही कारवाई व्हायला हवी. – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

देश आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. परंतु लाडक्या बहिणींची परिस्थिती मात्र सुधारली नाही. आरोग्य यंत्रणेच्या मदतीअभावी एका लाडक्या बहिणीला रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म द्यावा लागला, यापेक्षा महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल? – रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस