सांगलीत ‘जलजीवन’चा निधीअभावी बोजवारा; चार महिन्यांत 23 कामेच पूर्ण, अद्याप 500 कोटी खर्च प्रलंबित

केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना असलेली ‘हर घर जल’ अर्थात ‘जलजीवन मिशन’ योजनेत गतवर्षी 31 मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. तरीही निधीअभावी कामे पुढे सरकेनात. त्यामुळे जलजीवन योजनेचा जिह्यात पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. गेल्या चार महिन्यांत अवघी 23 कामे पूर्ण झाली असून, सुमारे 42 कोटी रुपयांची बिले थकल्याने ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. अद्याप 500 कोटी रुपयांचा खर्च प्रलंबित असून, योजनेचे भवितव्य अंधारात असल्याचे चित्र दिसून येते आहे.

पंतप्रधान मोदी सरकारने 2019 मध्ये शपथ घेतल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेची घोषणा केली. ही योजना मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 2025 वर्ष निम्मे सरत आले तरी योजना रडतखडत सुरू आहे.

सांगली जिह्यात 683 कामांपैकी  386 कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अजूनही सुमारे 300 कामे सुरू आहेत. तर पूर्ण झालेल्या कामातील केवळ 196 योजनांचे हस्तांतरण झाले आहे. यापूर्वी मुदतवाढीमुळे योजनेच्या खर्चात 132 कोटींची वाढ झाली होती. आता आणखी मुदतवाढ दिल्यामुळे योजनेच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे ही योजना पांढरा हत्ती बनत चालली आहे. सुरुवातीचा खर्च 792 कोटी 21 लाखांचा अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा खर्च आता 924 कोटींवर गेला आहे. कामे रखडली तर हा आकडा लवकरच एक हजार कोटी पार करण्याची शक्यता आहे.

तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेत माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यावेळी 31 मार्च 2024 पूर्वी कामे पूर्ण करा; अन्यथा कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र, ना योजना वेळेत पूर्ण झाल्या, ना कुणावर कारवाई झाली. परंतु, ग्रामपंचायत स्तरावरील अंतर्गत राजकारणामुळे कामांमध्ये अडथळेच जास्त येऊ लागले आहेत. गेल्या चार महिन्यांत पूर्ण झालेल्या कामांमध्ये केवळ 20 योजनांची भर पडली आहे.

यंदा फेब्रुवारीमध्ये या योजनेतील 363 कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर जूनपर्यंत केवळ 23 कामे पूर्ण झाली आहेत. तर योजना हस्तांतर होण्याचे प्रमाणही कमी आहे. चार महिन्यांत 22 योजना हस्तांतर करण्यात आल्या आहेत. अजून 320 योजनांची कामे सुरू आहेत. तीही कासवाच्या गतीने. त्यामुळे स्वतःच्या घरात नळातून पाणी येण्याची प्रतीक्षा ग्रामस्थांना अजून काही काळ करावी लागणार आहे.

जलजीवन मिशनच्या कामांना स्थानिक राजकारण अडचणीचे ठरत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामपंचायत निवडणुकीत जिह्यातील अनेक गावांमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर या योजनेचा खेळखंडोबा सुरू झाला. काही ठिकाणी टाकीची जागा बदल, कुठे पाइपलाइनची जागा बदल, अशी मागणी नवीन सत्ताधाऱयांकडून होऊ लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी योजनेच्या मूळ आराखडय़ात बदल करावे लागले. त्यांचे नव्याने सुधारित प्रस्ताव द्यावे लागले, हेही योजना रखडण्याचे एक कारण आहे.