जालन्यात तलावात बुडून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू

जालना शहराबाहेर असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या एका खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज 10 डिसेंबर रविवारी
दुपारच्या सुमारास घडली. वैभव गणेश कावळे असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

रविवारची सुट्टी असल्या कारणाने तीन मित्र पोहण्यासाठी तलावामध्ये उतरले असता एक जण पाण्यात बुडाला. दोन मुलांनी आरडा ओरडा केला. परंतु बचावासाठी जवळपास कोणीही नसल्याने एका मुलाच्या करूण अंत झाला. वैभव गणेश कावळे (15) रा. मातोश्री नगर, चंदनझिरा असे मयत मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस घटनास्थळी तात्काळ रवाना झाले. पोलिसांनी अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली असता अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला.परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने व त्यांच्याकडे पाण्यात उतरण्यासाठी बोट नसल्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी बोट आणण्यासाठी जालना शहरात रवाना झाले.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या काही युवकांना पाण्यामध्ये उतरून मृतदेह बाहेर काढण्याची विनंती केली. तेव्हा बर्‍याच परिश्रमानंतर सदरील मयत मुलास पाण्याबाहेर काढण्यास यश आले. शेख चांद पाशा, सय्यद जावेद, चंदू पोकळे या स्थानिक युवकांनी मयत मुलास पाण्याबाहेर काढले. सदरील घटनेची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयत मुलास शवविच्छेदनासाठी जालना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयांमध्ये पाठविले असून चंदनझीरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.