
जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. यात टोमॅटो, मिरची, कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाचा तडाखा वाढत असतांनाच रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान जोरदार हवेबरोबरच झालेल्या विजेचा लखलखाट व ढगांचा गडगडाटासह अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
सर्वाधिक नुकसान आंबे फळबागधारकाचे झाले आहे. जोरदार पावसामुळे शहरी भागासोबत ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. उन्हाचा प्रचंड तडाखा व वातवरणात अतिशय उष्णता निर्माण झालेली होती. रविवार 2 मे दुपारपर्यंत उन्हाचे चटके बसत असतानाच दुपारनंतर ढग जमा झाले. दुपारी चारनंतर जोरदार वारे वाहू लागून अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील काढणीसाठी तयारीत असलेला गहू, हरभरा झाकण्यासाठी धावपळ झाल्याचे दिसून आले.
त्याचप्रमाणे टोमॅटो, मिरची, कांदा, कोथिंबीरसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील भराडखेडा येथील आंबा, जांभुळ, सिताफळ, पेरु या बागांचेही नुकसान होवून झाडांवर बहरलेल्या आंब्यांना वादळी वाऱ्यामुळे तडाखा बसला असून प्रचंड प्रमाणात आंब्याची गळ झाली असून झाडाखाली आंब्याचा सडा पडलेला होता. त्याच प्रमाणे कांद्याची बियाणे उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांचे बियाचे डोंगळे (फुलांचा गुच्छ) ही विखरून खराब झाल्याचे चित्र आहे.



























































