जालन्यात लाखो रुपयाचा अवैध गुटखा तालुका पोलिसांनी पकडला

जालना जिल्हा हा सध्या गुन्हेगारीचा हॉटस्पॉट म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होत चालला आहे. या ठिकाणी रोज वेगवेगळ्या घटना घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे जालना पोलीस डोळ्यात तेल टाकून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज 11 फेब्रुवारी रोजी रात्री तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे नाव्हा येथे मालाचा गणपती परीसरात कर्तव्य बजावत असताना कंटेनर क्र. (एचआर 55 ए क्यू 2607), (एमएच 70 पी 2837) या आयशरमध्ये हे अवैध गुटखा यामध्ये सुगंधी तंबाखू जन्य पदार्थ वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. हे दोन्ही गाड्या परराज्यातील सिंदखेडराजा रस्त्याने जालन्याकडे येत होते.

या गुप्त माहितीवरून पोलिसांनी या कंटेनर आणि आयशरची झाडझडती घेतली असता यामध्ये त्यांना लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला आहे पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली वरिष्ठांच्या आदेशावरून तालुका पोलीस ठाण्यात एक आयशर टेम्पो आणि एक मोठे कंटेनर जप्त करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक केले जात आहे. या दोन्ही गाड्यांमधील गुटख्याचे मोजमाप रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ज्यात राज निवास,विमल गुटखा व जरद्याचे पोते व बॉक्स मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.