जालन्यात शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले ‘ते’ प्रेमी युगुलच

जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला आणि पुरुष असे दोघे आज 24 मे रोजी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह खाली घेतले. त्यानंतर त्यांच्याजवळ पोलिसांना सापडलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटविण्यात यश आले आहे.

हे दोघे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी असून एकाच गल्लीतील रहिवासी आहेत. कैलास काशिनाथ गवई आणि मुक्ता रामेश्वर खंडागळे असे दोघांचे नाव असून त्यांचे एकमेकावर प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे हे दोघेही विवाहित असून कैलास गवई यास एक मुलगा आणि मुक्ता खंडागळे हिस दोन मुले आहेत. त्यांच्या या प्रेमसंबंधाला नातेवाईकातून विरोध असल्याने ते दोघे काल रात्री मोटरसायकलवरून गायब झाले होते.

आज सकाळीच त्यांचे मृतदेह एकाच दोरखंडाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शेजारी त्यांची मोटारसायकल उभी होती.दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी दोघांचे मृतदेह जालना येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविले आहेत.