
पत्नीला माहेरी आणल्याने जावयाने सासू सासऱ्यांवर कुऱ्हाडीने मारहाण करीत हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री जालना जिह्यातील परतुर तालुक्यातील काऱ्हाळा येथे घडली. या प्रकरणी सासऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून जावायाविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काऱ्हाळा येथील ज्ञानेश्वर गणपत राठोड हे सोमवारी रात्री जेवण करून पत्नी व मुलीसह घरासमोर बसलेले असतांना त्यांचा जावई अमोल लक्ष्मण आढे हा त्या ठिकाणी आला व तुम्ही माझ्या पत्नीला माहेरी का आणले, असे म्हणत त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीवरही कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, या प्रकरणी ज्ञानेश्वर राठोड यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात ठाण्यात अमोल आढे रा. परतवाडीतांडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार जगन्नाथ सुक्रे हे करीत आहे.


























































