
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आलमगाव सजाच्या महिला तलाठी संगीता जळबा हैबते यांना तक्रारदाराकडून शेत जमीन नावावर करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने पकडले.महिला तलाठी यांच्या सजाच्या ठिकाणी आलमगाव येथेच रंगेहात पकडण्यात आले.
अंबड तालुक्यातील आलमगाव शिवार गट क्र. 130 मधील 1 हेक्टर 77 आर वडिलोपार्जित शेतजमीन तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या नावे करण्यासाठी व त्यांचे बहिणीचे हक्कसोड घेऊन सातबारावर फेर करुन देण्यासाठी आलमगाव येथील तलाठी लोकसेविका संगीता जळबा हैबते यांनी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. सदर कामासाठी
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून 21 ऑक्टोंबर रोजी तक्रार दिली.
सदर तक्रारीवरुन आज 2 नोव्हेंबर रोजी सापळा लावला असता संगीता हैबते यांनी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी करुन स्वतः पंचासमक्ष लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना पथकाने तलाठी सजा आलमगाव कार्यालय, अंबड येथे रंगेहाथ पकडण्यात आले. संगीता जळबा हैबते यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.



























































