जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीस ठोकल्या बेड्या, 13 पैकी 10 मूर्त्या केल्या हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणाचा तब्बल दोन महिन्यांनी छडा लावण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. मूर्ती चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रविवारी 30 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने अन्य एक संशयित गौरीशंकर वर्मा (रा. हैद्राबाद) यास ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. तर चोरीस गेलेल्या 13 पैकी 10 मूर्ती पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

जांब समर्थ येथील राम मंदिरातील समर्थ रामदास स्वामी यांच्या वंशपरंपरागत मूर्ती तसेच पूजेच्या मुख्य मुर्त्या दोन महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या. काही केल्या पोलिसांच्या हाती चोरटे लागत नव्हते. अखेर तांत्रिक अभ्यास करून पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी मूळच्या कर्नाटकमधील पण सध्या धाराशिवच्या रामनगरमध्ये राहणाऱ्या दोन, कर्नाटकमधून दोन आणि हैद्राबाद मधून एकास ताब्यात घेतले आहे.

शेख जिलानी, शेख पाशामिया, शेख राजू, महादेव चौधरी आणि गौरीशंकर वर्मा अशी आरोपींची नाव आहेत. मुख्य आरोपी शेख जिलानी याने गौरीशंकर वर्मा यांस उर्वरित मुर्त्या विक्री केल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पोलिसांनी त्यांस ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरु आहे. लवकरच उर्वरित तीन मुर्त्याही मिळून येतील असा विश्वास वर्तविण्यात येत आहे.