हिंदुस्थानसाठी ‘रन’मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा वन डे क्रिकेटमधील ग्रेट फिनिशर आहे, अशी स्तुतिसुमने क्रिकेटविश्वातील इंग्लंडचा माजी महान वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसनने उधळली आहेत. एकदिवसीय प्रकारामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना आणि तो यशस्वीपणे पूर्ण करताना भरभरून योगदान देण्यात आजपर्यंत विराटपेक्षा चांगला फलंदाज झालेला नाही, असेही तो म्हणाला.
कसोटीमध्ये बळी घेण्याचा निकष लावल्यास जेम्स अॅण्डरसन हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरतो. निवृत्त होण्यापूर्वी त्याने 188 सामन्यांत 704 कसोटी बळी टिपले आहेत. अॅण्डरसनव्यतिरिक्त कोणत्याही वेगवान गोलंदाजाला 700 बळींचा टप्पा पार करता आलेला नाही. कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहेत.
मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) हे फिरकीपटू अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत, मात्र हे दोघेही फिरकी गोलंदाज आहेत. यामुळे अॅण्डरसनसारख्या दिग्गजाने विराटबाबत केलेल्या वक्तव्यावरून जागतिक क्रिकेटमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. टेलेंडर्स पॉडकास्टवर बोलताना अॅण्डरसन म्हणाला, ‘वन डे क्रिकेटच्या इतिहासात विराटपेक्षा दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणारा आणि धावांचा पाठलाग करणारा दुसरा कोणी फलंदाज माझ्या बघण्यात आलेला नाही.