2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्या, जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची मागणी

479

दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचं प्रकरण आता उच्च न्यायालयात दाखल झालं आहे. जामिया विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने दिल्ली उच्च न्यायालयात या हिंसाचाराची नुकसान भरपाई म्हणून 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, शाययान मुजीब असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्या याचिकेनुसार, तो वाचनालयात असताना तिथे आलेल्या पोलिसांनी मारहाण करून त्याचे दोन्ही पाय तोडले. त्यामुळे तो हिंडू-फिरू शकत नाही. तसंच त्याने पायांच्या उपचारांसाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे त्याने 2 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिल्ली सरकार आणि पोलिसांना नोटीस पाठवून उत्तरे देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मुजीबची याचिका जामिया विद्यापीठ प्रकरणातील इतर याचिकांसोबत संलग्न करण्यात आली आहे. या याचिकांवर जून महिन्यात सुनावणी होणार आहे.

रविवारी जामिया समन्वय समितीने एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात सीआरपीएफचे जवान जामियाच्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत होते. आता या घटनेचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात काही आंदोलक दगड घेऊन लायब्ररीमध्ये घुसताना दिसत आहेत. त्यामुळे या घटनेला वेगळेच वळण लागले आहे.

रविवारी जामिया समन्वय समितीने व्हिडीओ जारी केल्यानंतर दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफवर चौफेर टीका झाली. त्यानंतर मारहाणीपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात अनेक आंदोलनकर्ते लायब्ररीमध्ये घुसले आहेत. त्यात अनेक मास्क लावलेले असून काही आंदोलनकर्त्यांच्या हातात दगडही दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या