जम्मू-कश्मीर, हिमाचलमध्ये ढगफुटी; 13 ठार

जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये बुधवारी ढगफुटीमुळे प्रचंड हाहाकार उडाला. ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये 13 नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 ते 40 लोक बेपत्ता आहेत. सिंधू नदीच्या पाणीपातळीत भयंकर वाढ झाली आहे. उदयपूरमध्ये नाल्याच्या पूरात 12 मजूर वाहून गेले. ढगफुटीचा धोका अद्याप कायम असल्यामुळे डोंगराळ भागात लष्करासह एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात असून युद्धपातळीवर ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवले जात आहे.

बुधवारी पहाटे साडेचार वाजता जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील होंजर डच्चन गावामध्ये ढगफुटी होऊन अनेक जण वाहून गेले. यातील चौघांचे मृतदेह सापडले, तर सायंकाळपर्यंत 17 लोकांना वाचवण्यात आले. अजूनही 30 ते 40 जण बेपत्ता असून खराब वातावरणामुळे पोलीस आणि लष्कराच्या जवानांना ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये अडचणी येत आहेत. जखमींना एअरलिफ्ट करण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. दुसरीकडे अमरनाथ गुंफेच्या परिसरातही सायंकाळी ढगफुटी झाली. यात बीएसएफ, सीआरपीएफ, जम्मू-कश्मीर पोलिसांच्या कॅम्प्सचे प्रचंड नुकसान झाले. कोरोना महामारीमुळे अमरनाथ यात्रा बंद असल्याने परिसरात पर्यटक नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत जीवितहानी टळली. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती परिसरात ढगफुटीने नाल्याला आलेल्या पुरात 9 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी काही लोक वाहून गेले आहेत.

जम्मू-कश्मीरमध्ये ‘रेड अॅलर्ट’

हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. 31 जुलैपर्यंत जम्मू- कश्मीरमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा देत हवामान खात्याने ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे. ढगफुटीत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी तसेच पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ व एसडीआरएफची पथके तैनात आहेत. ठिकठिकाणी दरड कोसळून 60 हून अधिक वाहने ढिगाऱयाखाली अडकली आहेत.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी घेतला दुर्घटनेचा आढावा

ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा घेतला. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुर्घटनेतील नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगफुटीच्या स्थितीवर केंद्र सरकार नियंत्रण ठेवून असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या