कश्मीरातील लोकांचे जगणे मुश्कील झालेय!

462

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये लादलेल्या निर्बंधांमुळे स्थानिक लोकांचे जगणे मुश्कील झालेय, रोजच्या जीवनात गरजेच्या असलेल्या मूलभूत गोष्टी मिळत नाहीत, रुग्ण औषधांविना तडफडताहेत. सरकारने याचा विचार करून विविध सेवांवरील निर्बंध तातडीने हटवावेत, अशी विनंती करणारे पत्र देशातील 500 हून अधिक शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

कलम 370 हटवल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून सरकारने जम्मू-कश्मीरमधील मोबाईल, इंटरनेट अशा विविध सेवांवर निर्बंध घातले, मात्र यामुळे स्थानिकांना औषधे वा इतर मूलभूत गोष्टी मिळत नाहीत. फोन लागत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पालकांशी बोलता येत नाही, असे म्हणणे शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी मांडले आहे. कोलकाता, पुणे आणि थिरुवनंतपुरम येथील इंडियन इन्स्टिटय़ूटस् ऑफ सायन्स एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आदी विविध संस्थांतील शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे.

विरोधकांना नजरकैदेत ठेवणे लोकशाहीविरोधी!

विरोधी पक्षातील नेते तसेच फुटीरतावाद्यांना नजरकैदेत ठेवणे हे लोकशाहीच्या नेमके विरोधी आहे, असे शास्त्र्ाज्ञांनी म्हटले आहे. व्यक्ती कोणत्याही विचारधारेची असो. कोणताही गुन्हा वा आरोप नसताना राजकीय विरोधकांना अशा प्रकारे ताब्यात ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, असा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या