
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारिया याला जम्मू-कश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीनगर पोलीस आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ब्रिनाल-लामड परिसरातून कटारियाला अटक केली. कटारिया हा लश्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य आहे.
कटारियाने पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हल्ल्यांचे नियोजन करण्यात आणि रसदविषयक मदत केली होती. कटारियाचा शोध घेण्यासाठी रिव्हर्स इन्व्हेस्टिगेशनचा वापर करण्यात आल्याचे जम्मू-कश्मीर पोलिसांनी सांगितले. तपास पथकाने विविध सूत्रांचे विश्लेषण करत त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली. प्राथमिक तपासात असेही आढळून आले की कटारियाने दहशतवाद्यांना शस्त्रे, रेशन आणि इतर आवश्यक साहित्य पुरवले.
कटारियाची अटक ही दहशतवादाविरुद्ध एक महत्त्वपूर्ण यश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कला आळा घालण्यास मदत होईल, असेही ते पुढे म्हणाले.