कश्मीरमध्ये मोबाईल सेवा सुरू झाल्यानंतर काही तासांत मेसेज सेवा बंद

393

जम्मू कश्मीरमध्ये पोस्टपेड सेवा सुरू झाल्यानंतर काही तासात मेसेज सुविधा बंद झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा सोमवार संध्याकाळी 5 वाजल्यापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून घालण्यात आलेल्या निर्बंधापैकी पोस्टपेड मोबाईल सेवा 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू झाली. तब्बल 72 दिवसांनी फोन सुरू झाल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असलेल्या कश्मीरमधील व्यापारी, हॉटेलमालक ते सर्वसामान्य या सगळ्यांनाच मोठा दिलासा मिळाला होता. पण इंटरनेट आणि मोबाईल सेवेमुळे पर्यटकांशी संपर्क साधणे, त्यांना माहिती देणे शक्य होत नव्हते. दरम्यान, 72 दिवसांनी फोन सुरू झाल्यामुळे काही जणांनी उत्साहाच्या भरात एका तासांत 30 फोन केले होते.

पण, याचा गैरफायदा घेऊन दहशत माजवण्याच्या बेतात टपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली. सोमवारी एका पाकिस्तानी दहशतवादी आणि स्थानिक दहशतवाद्याने राजस्थान इथून आलेल्या ट्रक ड्रायव्हरची हत्या केली होती. त्याखेरीज दहशतवाद्यांनी शोपियांन इथल्या सफरचंदाच्या बागांच्या मालकांना मारहाणही केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव एसएमएस सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या