
जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एक मोठा हल्ला रोखला आहे. स्फोटकांनी भरलेल्या एका ड्रोनला नष्ट करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. हा ड्रोन पाकिस्तानकडून आला होता.
जम्मू कश्मीरच्या कचनाक परिसरात ही घटना घडली आहे. तैनातीवर असलेल्या सुरक्षा दलांना मध्यरात्री एक ड्रोन उडत येताना दिसला. वेळीच धोका ओळखून दलांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला आणि त्याला खाली पाडलं. ड्रोन खाली पडल्यानंतर त्यावर आईडी स्फोटकं बांधलेली असल्याचं आढळलं.
हे आईडी जवळपास पाच किलो इतकं होतं. जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनला हिंदुस्थानी सीमेच्या सहा किलोमीटर आत पाडलं गेलं. या ड्रोनवर जी स्फोटकं होती, त्यांचा स्फोट झाला असता तर खूप नुकसान झालं असतं.
हिंदुस्थानी सीमाभागात ड्रोन दिसण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी घगवाल येथील नोनाथ आश्रमाजवळील हायवेनजीक 600 मीटर खोलीच्या एका खड्ड्यात पाकिस्तानमधून आलेल्या ड्रोनने हत्यार टाकली होती.
त्यानंतर श्रीनगर येथील एक ट्रक चालक असलेल्या मुंतजर मंजूर हा त्याचा साथीदार आणि जैशचा दहशतवादी शौकत याच्यासोबत तिथे आला. त्याने काही हत्यारं उचलली. दुसऱ्यांदा जेव्हा तो हत्यार उचलायला आला, तेव्हा त्याला अटक करण्यात आली होती.





























































