
जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत लष्कराचे दोन जवानही शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने जवानांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सुभेदार परभात गौर आणि लान्स नाईक नरेंद्र सिंधू हे दोन जवान कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडले. ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक स्थानिक दहशतवादी होता तर दुसरा ‘रेहमान भाई’ या सांकेतिक नावाने कार्यरत असलेला परदेशी असल्याचे कळते.
जखमी झालेल्या लष्कराच्या दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुप्त माहितीच्या आधारे लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने कुलगामच्या गुड्डर जंगलात संयुक्त शोध मोहिम सुरू केली. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे तीन जवान जखमी झाले. त्यापैकी दोन जवानांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.