झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेच्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. करमाटांडजवळ कालाझरिया येथे ही घटना घडली. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांना याबाबतची सूचना देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी रेल्वेतून बाहेर उडय़ा टाकल्या. याचवेळी झाझा-आसनसोल रेल्वे ट्रकवर उडय़ा टाकलेल्या प्रवाशांना अक्षरशः कापतच पुढे गेली.
अपघातानंतर मृतदेह रुळावरच इकडे तिकडे विखुरलेले तसेच प्रवाशांचे बुट आणि सामान पडलेले आढळून आले. आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱयांनी सांगितले. दुसरीकडे चेन ओढल्यामुळे रेल्वे थांबवली होती. रेल्वे थांबवल्यानंतर काही लोक रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरून येणाऱया रेल्वेने प्रवाशांना चिरडल्याचे रेल्वे अधिकाऱयांनी सांगितले. मृतांचा नेमका आकडा अद्याप समोर आला नसून वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, बंगळुरू- यशवंतपूर एक्स्प्रेस डाऊन लाईनमध्ये थांबवली होती. यावेळी अनेक प्रवासी दुसऱया रेल्वेतून खाली उतरले होते. मात्र, त्याचवेळी दुसऱया लाईनवरून आलेल्या ट्रेनने त्यांना धडक दिली.